अलिबाग – दंडाची कारवाई होऊ नये म्हणून वाहनधारक सुरक्षित नंबर प्लेट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु वाहनांची अवाढव्य संख्या आणि मनुष्यबळ कमी पडत असल्याने मागील सहा महिन्यांत केवळ ३१.२२ टक्के वाहनांच्या उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बदलण्यात आल्या आहेत. अद्याप दोन लाख ७७ हजार ९३० वाहनांना सुरक्षित नंबर बसवणे शिल्लक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत नंबर प्लेट लावणे बंधनकारक असल्याने वाहनधारकांची धावपळ वाढली आहे.
पेण परिवहन विभागातील ११ तालुक्यांसाठी फक्त सात केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तीन लाख ८३ हजार वाहनांची बदलावी लागणार आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. या नंबर प्लेट १ एप्रिलपूर्वी बसवण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून, आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाहनांना नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले आहे.
मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही, तर मोटर वाहन कायदा १९८८ नुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी आवश्यक
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनधारकांनी वेळेत नंबर प्लेट बदलण्याचे आवाहन केले जात आहे. गर्दी झाल्यास योग्य उपाययोजना सूचना करण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी नंबरप्लेटसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, ३१ डिसेंबर नंतर ती तारीख असेल तरी दंड टाळता येणार आहे, असे आवाहन पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांनी केले आहे
जुन्या वाहनांसाठी फक्त नंबर प्लेट बदलण्याकरीता इतके दिवस फेऱ्या मारुनही नंबरप्लेट वेळेत मिळालेली नाही. हेलमेट, पियुसी, हेडलाईट, सीटबेल्टप्रमाणेच नंबरप्लेट हा एक चालकांना वेठीस धरण्याचा कारण ठरणार आहे. – राजेश पाटील, वाहनचालक
१ मार्च २०१९ पुर्वीच्या वाहनांची संख्या ३ लाख ८३ हजार
बसवण्यात आलेल्या नंबरप्लेट – १ लाख ५ हजार
शिल्लक नंबरप्लेट – २ लाख ७७ हजार
नंबर प्लेटसाठी अर्ज – १ लाख २१ हजार
