अलिबाग : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी जागा जमिनी खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील निबंधक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. एकाच दिवसात तब्बल १२ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्कापोटी जमा झाला. ३१ मार्च रोजी जिल्ह्यात ६६८ दस्तांची नोंदणी करण्यात आली.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रेडी रेकनरचे दर बदलतात. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जागा जमिनीच्या नोंदणीला वेग येतो. संभाव्य मुद्रांक शुल्क वाढ टाळण्यासाठी दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जाते. याचाच प्रत्यय ३१ मार्च रोजी रायगडकरांना आला. रायगड जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी गर्दी केली होती. एका दिवसात ६६८ दस्त नोंदणी झाली. ११ कोटी ९० लाख ५८ हजार ४०५ रुपयाचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा झाला.

संभाव्य दस्त नोंदणी लक्षात घेऊन नोंदणी महानिरीक्षकांनी सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मालमत्तेची दस्त नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी झाल्याने शेवटच्या दिवशी शासनाच्या तिजोरीत करोडीचा महसूल जमा झाला आहे.

जिल्ह्यातील २० दुय्यम कार्यालयात ऑफलाईन ४०८ तर ऑनलाइन २६० अशी एकूण ६६८ दस्त नोंदणी ३१ मार्च रोजी झाली आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क ऑफलाईन ११ कोटी ३३ लाख ६ हजार ८४, ऑनलाइन २ लाख ४८ हजार २६६ तर नोंदणी शुल्क ऑफलाईन ५ लाख ३० हजार ४ हजार ४७०, ऑनलाईन १ लाख ९९ हजार ५८५ अशी एकूण ११ कोटी ९० लाख ५८ हजार ४०५ महसूल एका दिवसात जमा झाला आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमित शेडगे यांनी दिली.

गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यात जागा जमिनींना मोठी मागणी आली आहे. सागरी मार्गाने आणि रस्ते मार्गाने दक्षिण मुंबई रायगडशी थेट जोडली गेल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा या ठिकाणी वळवला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या विकासामुळे पनवेल उरण मधील जागा जमिनींना मोठी मागणी निर्माण झाली आहे. तर अलिबाग पेण कर्जत खोपोली येथे मोठ्या प्रमाणात जागा जमिनींचे व्यवहार सुरू झाले आहेत. याचा प्रत्यय 31 मार्च रोजी च्या नोंदणी करून पुन्हा एकदा आला.