अलिबाग – रायगडच्‍या तळा तालुक्यातील चरई बुद्रुक येथील जांभा दगडाच्या खाणीत दोन वर्षांपासून वेठबिगारीत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील नऊ तरुणांची प्रशासनाने सुटका केली. अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खाणमालक लक्ष्मण रामजी तांबे यांच्या खाणीतील मुकादम सुदाम राठोड आणि सुमन यांना अटक करण्यात आली आहे. रोजगाराच्या शोधात उत्तर प्रदेशातून रायगडमध्ये आलेले १८ ते २४ वयोगटातील हे तरुण खाणीत अमानवी परिस्थितीत काम करत असल्याची माहिती अंकुर ट्रस्टला मिळाली होती. त्यानंतर संस्थेने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार संयुक्त शोधमोहीम आखण्यात आली.

माणगावचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या समन्वयातून तळा तहसीलदार स्वाती पाटील, कामगार विभागाचे अधिकारी आणि तळा पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. यासाठी तयार केलेल्‍या खास पथकाने खाण परिसरात धडक मोहीम राबवली. तरुणांचे स्वतंत्र जबाब नोंदवून त्यांच्या कामाच्या आणि राहण्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नऊही तरुणांची मुक्तता करण्यात आली. त्यांना मुक्तता प्रमाणपत्र देऊन पोलीस संरक्षणात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील मूळ गावी रवाना करण्यात आले.

अंकुर ट्रस्टच्या कायदेतज्ज्ञ ॲड. तृप्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुकादम सुदाम राठोड आणि सुमन यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २३ नुसार वेठबिगारी आणि सक्तीची मजुरी प्रतिबंधित आहे. वेठबिगारी पद्धती (निर्मूलन) कायदा १९७६ नुसार वेठबिगारी लादणे हा दंडनीय गुन्हा असून, दोषींना तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे, अशी माहिती ॲड. तृप्ती पाटील यांनी दिली.

वेठबिगारी म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्याची आणि प्रतिष्ठेची पायमल्ली आहे. केवळ सुटका करून तरुणांना गावी पाठवणे पुरेसे नसून त्यांना थकीत मजुरी, नुकसानभरपाई आणि शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे, असे अंकुर ट्रस्टच्या संचालक डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले. तर मुक्त तरुणांच्या पुनर्वसनासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधून आर्थिक मदत, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी स्‍पष्‍ट केले.