अलिबाग-  पॅंटच्या खिषात मोबाईल ठेऊन फिरण्याची तुम्हाला सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तपमानाचा पारा वाढत असल्याने त्याचा परिणाम मोबाईल सारख्या उपकरणांवरही होत आहे. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात समोर आली आहे. जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. काय आहेत या घटने मागची कारणे याचा थोडक्यात आढावा.

झाले काय?

मुंबईत राहणारे महेश नागते वय ३८ हे रायगड जिल्ह्यातील आडनाळे गावात आपल्या गावी एका कार्यक्रमासाठी आले होते. सगळे काही सुरळीत सुरू होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास ते घरात जेवायला बसले. जेवतांना अचानक त्यांच्या जिन्स पँटच्या खिशात असलेल्या मोबाईलचा अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्यांच्या पँटचा खिसा पूर्णपणे जळून खाक झाला असून, त्यांच्या डाव्या मांडीला आणि हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागते यांच्या घरात धावपळ उडाली.

रुग्णालयात काय झाले?

स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी धाव घेत महेश नागते यांना तातडीने तळा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने नागते यांना गंभीर दुखापत झाली नाही. डॉक्टरांनी त्यांना  प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवले आहे. पण या घटनेमुळे मोबाईलच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टरांनी मोबाईल हाताळतांना योग्यती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. घरात असतांना मोबाईल खिशात अथवा रात्री झोपतांना उशी जवळ ठेऊन झोपू नका असा सल्ला दिला आहे.

घटनेनंतर नागते यांनी काय सांगितले?

मोबाईलचा नेमका स्फोट का झाला हे कळले नाही. हा मोबाईल चार ते पाच वर्ष जूना होता. कदाचित मोबाईलची बॅट्री तापून स्पार्क होऊन ही घटना घडली असावी. उन्हाळ्या मोबाईल तापण्याच्या घटना सतत घडत असतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्याचे गंभीर परिणाम घडू शकतात असे मत नागते यांनी या दुर्घटनेनंतर व्यक्त केले आहे. वरच्या खिशात मोबाईल असता तर जास्त इजा झाली असती अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. कडक उन्हात मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाढत्या उष्णतेचा मोबाईलवर कोणता परिणाम होतो?

राज्यात तपमानाचा पारा सध्या चाळीशी पार झाला आहे. तीव्र उन्हाच्या झळामुळे मोबाईल तापण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अशा तीव्र उष्णतेमध्ये बॅटरी गरम होऊन त्याचे विपरित परिणाम मोबाईलच्या बॅटरीवर होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी आपले स्मार्टफोन वापरताना आणि खिशात ठेवताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे