scorecardresearch

निधी विनियोगात रायगड राज्यात अव्वल; जिल्हा आराखडय़ातील १०० टक्के निधी खर्च

अलिबाग- जिल्हा वार्षिक आराखडय़ातील १०० टक्के निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा नियोजन विभागाला यश आले आहे.

हर्षद कशाळकर

अलिबाग- जिल्हा वार्षिक आराखडय़ातील १०० टक्के निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा नियोजन विभागाला यश आले आहे. दिलेल्या मुदतीत विकास निधीचा विनियोग करण्यात रायगड राज्यात अव्वल ठरला आहे.  सन २०२१-२२ करता रायगड जिल्ह्यासाठी २७५ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ३१ मार्च अखेर २७५ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. म्हणजेच जिल्हा विकास योजनेतील शंभर टक्के निधी खर्ची पडला आहे. म्हणजेच या वर्षी एक रुपयाचा निधीही शासनाकडे वापराअभावी समर्पित झालेला नाही.

   योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे यश संपादन करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जवळपास ५० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून ती कामे मार्गी लावण्यात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि नियोजन अधिकारी जे. एम. मेहेत्रे यशस्वी ठरले आहेत.

    जिल्हा विकास निधीआंतर्गत सर्व विभागांना दिलेला निधी मार्चअखेर पर्यंत खर्च झालाच पाहिजे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना दिल्या होत्या. यासंदर्भात एकूण १६ आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. या निर्देशांचे बहुतांश विभागांनी पालन केले. त्यामुळे ३१ मार्चला दुपारी १ वाजताच शंभर टक्के निधी खर्ची पडला. त्यामुळे जिल्हा विकास निधी विनियोगात रायगड यंदा राज्यात अव्वल ठरला आहे.

   २०२०-२१ या आर्थिक वर्षांत करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे जिल्हा विकास निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. त्यामुळे जवळपास १४ टक्के निधी समर्पित झाला होता. या वर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नेटाने प्रयत्न करण्यात आले. या वर्षीही जिल्हा विकास निधीवर करोनाचे सावट होते. मात्र सप्टेंबर महिन्यानंतर राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना वार्षिक निधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उपलब्ध झाला. त्यामुळे चार महिन्यांत सर्व कामे मार्गी लावून निधी खर्च करण्यात आला.   

   आमदार निधीतील ५० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात आमदार विकास कार्यक्रमासाठी १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधीही मार्गी लावण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: कोषागार कार्यालयात जाऊन निधी विनियोगाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

आर्थिक वर्ष    मंजूर निधी    खर्च   खर्चाची टक्केवारी

२०१७-१८       १७९.७०       १७९.२८     ९९.८

२०१८-१९       १८९.१७       १८८.२४     ९९.५

२०१९-२०       २११          २०६.८८     ९८.०

२०२०-२१       २३४          २०२        ८६.४

२०२१-२२       २७५          २७५        १००

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raigad tops state fund allocation funding expenditure district plan ysh

ताज्या बातम्या