अलिबाग – रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवे बळ देणाऱ्या पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रायगडमधील पर्यटन विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रोप वे कुठे होणार?

मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये घारापुरी (एलिफंटा) लेणी, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला आणि अलिबागमधील श्री क्षेत्र कनकेश्वर डोंगर या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प सार्वजनिक वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.केंद्र सरकारच्‍या पर्वतमाला अंतर्गत महाराष्‍ट्रात दुर्गम डोंगराळ गर्दीच्‍या पर्यटन स्‍थळांना जोडण्‍यासाठी 45 हून अधिक प्रकल्‍प प्रस्‍तावीत आहेत. यापैकी 16 प्रकल्‍प राज्‍य सरकार स्‍वतः साकारणार असून उर्वरीत 29 प्रकल्‍प केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून पीपीपी तत्‍वावर उभारले जाणार आहेत.

प्रकल्प का महत्वाचे ?

अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून कुलाबा किल्ल्यापर्यंत रोप-वे सुरू झाल्यास भरती-ओहोटीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल आणि पर्यटकांना वर्षभर सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडावर जाणाऱ्या रोप-वेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेरळ–माथेरान रोप-वे प्रकल्पामुळे माथेरानपर्यंतचा प्रवास अधिक जलद व सुलभ होणार असून, कनकेश्वर डोंगरासाठीचा रोप-वे धार्मिक पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. तसेच घारापुरी लेणीपर्यंतच्या रोप-वे प्रकल्पामुळे जागतिक वारसा स्थळाला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

फायदा काय होणार ?

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायांना चालना, हॉटेल, वाहतूक आणि अन्य सेवा क्षेत्रांचा विकास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे झळकणार असल्याचे मत पर्यटन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. प्रकल्पांच्या पुढील टप्प्यात सविस्तर आराखडा, पर्यावरणीय मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, हे प्रकल्प रायगडच्या पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.