अलिबाग : रायगड जिल्ह्यात एप्रिल आणि मे २०२५ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तब्बल २,४८४ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा बाधित झाल्या असून ६,५७८ शेतकऱ्यांना फटका बसला होता. मात्र, नुकसान होऊन वर्ष उलटले तरी अनेक शेतकरी अद्याप भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडे १ कोटी १० लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्याप निधी मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस अधिक जोखमीचा बनत चालला आहे. अवेळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. “निसर्ग जगू देत नाही आणि शासनाची मदत वेळेवर मिळत नाही,” अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मे २०२६ मध्येही अवेळी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावून घरे, फळबागा आणि शेतीचे नुकसान केले आहे. कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे सुरू असताना, गतवर्षीच्या नुकसानीची भरपाईच अद्याप मिळालेली नसल्याने यंदाच्या नुकसानीची मदत कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
एप्रिल २०२५ मधील अवेळी पावसामुळे ६०९.८ हेक्टर क्षेत्रावरील फळपीक व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी १,८९० शेतकरी बाधित झाले होते. त्यानंतर मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ४,६८८ शेतकऱ्यांच्या १,८६८.३ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती आणि फळबागांचे नुकसान झाले होते. दोन्ही घटनांनंतर कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला होता. शासनाकडून आतापर्यंत ७० लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे.
मात्र, आणखी १ कोटी १० लाख रुपयांची भरपाई अद्याप प्रलंबित आहे. यंदाचा पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही गतवर्षीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. “शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
नुकसानीचा आढावा
एप्रिल २०२५ : ६०९.८ हेक्टर क्षेत्र बाधित, १,८९० शेतकरी प्रभावित
मे २०२५ : १,८६८.३ हेक्टर क्षेत्र बाधित, ४,६८८ शेतकरी प्रभावित
एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र : २,४७८ हेक्टरपेक्षा अधिक
एकूण बाधित शेतकरी : ६,५७८
वितरित मदत : ७० लाख रुपये
प्रलंबित मदत : १ कोटी १० लाख
