अलिबाग – रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. सोमवारी दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या तर मंगळवारी पहाटे उत्तर रायगड मधील बहुतेक तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरात गारपिटही झाली.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे पावसाच्या सरी बरसलील असा अंदाज होताच. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी पहाटे सहा वाजल्यापासून विजांचा कडकडाट सुरू झाला. थोड्यावेळाने पावसाच्या सरी बसरण्यास सुरुवात झाली.

अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. रेवदंडा परिसरात गारपिटही झाली. बागमळा येथे ताडाच्या झाडावर भली मोठी वीज पडली. त्यामुळे झाडाला आग लागली, त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोग धास्तावले होते.

अलिबाग तालुक्यातील कोपरे येथे दुसरी वीज कोसळली, मनोज ठाकूर यांच्या अगणातील नारळाच्या झाडावर ही वीज कोसळली, त्यामुळे झाडाने पेट घेतला. या वीजेच्या धक्याने ठाकूर यांच्या घरातील टीव्ही आणि फ्रिज यासारख्या इलेक्ट्रोनिक वस्तूंचे नुकसान झाले.

सकाळच्या सत्रात अचानक आलेल्या या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. ऐन उन्हाळ्यात छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडण्याची वेळ अनेकांवर आली होती. दरम्यान या पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आली. पावसामुळे वीट भट्टी व्यवसायिकही धास्तावले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी दक्षिण रायगड मधील महाड पोलादपूर, माणगाव तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मंगळवारी अलिबाग, पेण, कर्जत खालापूर परिसरात पावासाच्या सरी बरसल्या आहेत.