अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसाने अनेक तालुक्यांना तडाखा दिला. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसामुळे विविध ठिकाणी घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले. तळा तालुक्यात अंगावर वीज पडून १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.तळा तालुक्यातील फळशेत गावातील वेदांत साळुंखे (वय १४) याचा वीज पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये घरांचे अंशतः नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सुधागड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सहा गावांमधील तब्बल २४ घरांचे अंशतः नुकसान झाले. तसेच कवेळे येथील निलेश गणपत तळकर यांच्या पोल्ट्री शेडचे मोठे नुकसान झाले असून, शेड उडून गेल्याने सुमारे दीड ते दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.महाड तालुक्यातील कोंडीवते, कांबळेतर्फे महाड, चांढवेकोंड, कोल आणि चांभारखिंड या गावांमध्ये अंदाजे ४० ते ५० घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
खालापूर तालुक्यातील चौक, जांभुर्डी, दुरशेत, भिलवले ठाकूरवाडी आणि वाणिवली या गावांमध्येही वादळी पावसाचा फटका बसला असून २० ते ३० घरांचे नुकसान झाले आहे.म्हसळा तालुक्यातील संदेरी गावातील काही घरांचेही अंशतः नुकसान झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.दरम्यान, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
