अलिबाग- विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ५ लाख ८४ हजार ११८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्के आहे. जिल्ह्यात अजूनही १ लाख ९८ हजार मतदार असे आहेत. ज्यांची २००२ च्या मतदार यादीशी जोडणी होऊ शकलेली नाही ही नावेही आगामी काळात वगळली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत घरभेटी देऊन सर्व मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात आले. २००२च्या मतदार यादीशी जोडणी न झालेली मतदारांची नावे या मोहीमे नंतर वगळण्यात आली आहे. तर संदिग्ध आढळून आलेल्या मतदारांची चौकशी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ३३ हजार ७३९ मतदार होते. यातील १९ लाख ४९ हजार ३४१ मतदारांची मॅपिंग आणि गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. तर तब्बल ५ लाख ८४ हजार ११८ मतदारांची गणना प्रपत्र संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे ही नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. १ लाख ९८ हजार ३४१ मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी जोडणी होऊ शकलेली नाही. तर १ लाख ८४ हजार २६३ मतदार हे संदिग्ध आढळून आले आहेत. त्यामुळे मॅपिंग न झालेल्या आणि संदिग्ध आढळून आलेल्या मतदारांना नोटीसा देऊन चौकशी केली जाणार आहे. यासाठी १२६ प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुक आयोगाला आवश्यक असलेला पुरावे या मतदारांनी विहीत नमुन्यात सादर केले नाही तर संदिग्घ आणि मॅपिंग न झालेल्या मतदारांची नावेही वगळली जाणार आहेत. जिल्ह्यात पनवेल मधील सर्वाधिक ४२ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. तर उरण मधील २३ टक्के मतदारांची नावे वगळली आहेत. इतर विधानसभा मतदारसंघात साधारणपणे १२ ते १५ टक्के मतदारांची नावे वगळली गेली आहेत. ज्या मतदारांची नावे व कळविण्यात आली आहेत. ते विहित नमुन्यात 30 सप्टेंबर पर्यंत अपील दाखल करू शकणार आहे. संबंधित अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात. किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड</strong>
