अलिबाग- देशभरात एसआयआर प्रक्रीयेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतांनाच आता रायगड जिल्ह्यात तब्बल पावणे चार लाखांहून अधिक मतदारांना एसआयआरच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. ज्यात पनवेल मधील सर्वाधिक दीड लाख मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. कागदपत्र आणि पुराव्यांची जुळवाजुळव करतांना मतदारांची तारांबळ उडत आहे. मतदार याद्यांच्या शुध्दीकरणासाठी देशभरात एसआयआर प्रक्रीया राबविली जात आहे. राज्यातही पहिल्या टप्प्यातील ही प्रक्रीया पार पडली.
यात मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी जोडणी आणि गणना प्रपत्र संकलन करण्यात आले. यानंतर प्रारुप यादी प्रसिध्द झाली. मात्र प्रारुप यादीत नावे येूऊनही लाखो मतदारांना निवडणूक विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत. वडील आणि मुलांमधील वयाचे अंतर योग्य वाटत नाही, २००२ च्या मतदार यादीशी जोडणी योग्य प्रकारे झाली नाही, जी जोडणी झाली आहे ती चुकीची झाली असल्याची शक्यता आहे. विवाहीत महिलांना नावात बदल असल्याचे कारण देऊन या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ठराविक दिवशी आणि ठराविक वेळी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जात आहेत. पण ही वेळ आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना मतदारांना कसरत करावी लागत आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील१ लाख ५० हजार ४२४ मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कर्जत खालापूर मतदार संघातील ३३ हजार २९४, उरण मतदारसंघातील ५८ हजार ६९८, पेण मधील ३० हजार ३८१, अलिबाग मधील ४२ हजार ७४१, महाड मधील ४२ हजार ४३३, तर श्रीवर्धन मतदारसंघातील २४ हजार ८६० मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८३१ मतदारांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात २५ लाख ३३ हजार ७३९ मतदार होते, एसआयआर प्रक्रीयेनंतर ५ लाख ८४ हजार ११८ मतदारांची नावे वगळली गेली. त्यामळे १९ लाख ४९ हजार ३४१ मतदार शिल्लक राहीले . आता ३ लाख ८२ हजार ८३१ मतदारांना पुन्हा नोटीसा प्राप्त झाल्या आहे. यात प्रारूप यादीत नावे समाविष्ठ असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे नोटीसा प्राप्त झालेले मतदार धास्तावले आहेत.
ज्या मतदारांना नोटीसा आल्या आहेत. त्यांच्या सुविधेसाठी बुथ लेव्हल अथवा गाव पातळ्यांवर विशेष कॅम्पचे आयोजन केले जात आहे. ज्यात गणना प्रपत्रातील आक्षेप आणि त्रृटी दूर करण्यासाठी मतदारांकडून आवश्यक पुराव्यांचे संकलन करून घेत आहोत. – नितीन वाघमारे, जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड.
