अलिबाग– राज्यभरात विशेष सखोल मतदार पुनरिक्षक कार्यक्रम राबविला जात आहे. मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मतदारांच्या घरभेटीवर येणार आहेत. या कार्यक्रमा अंतर्गत मतदार यादीतील समाविष्ठ असलेल्या मतदारांची पात्रता तपासली जाणार आहे, पण मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरभेटीवर येण्या ऐवजी मतदारांनाच केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात या मोहीमेचा मतदारांना मनस्ताप होत असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने १६ राज्य आणि तीन केंद्र शासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ३० जून पासून मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी घरोघरी भेटी देणार आहेत. या दरम्यान मतदारांच्या पात्रतेची सखोल तपासणी केली जाणार आहे. २००२ च्या मतदार यादीशी जोडणीकरून मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. यात अपात्र आढळून येणाऱ्या मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.

जिल्ह्यात २५ लाख ३३ हजार ७३९ मतदार आहेत. यातील ६५.९५ टक्के मतदारांची २००२च्या मतदार यादीशी यशस्वीपणे जोडणी झाली आहे. ३५ टक्के मतदारांची जोडणी शिल्लक आहे. १५ टक्के मतदारांच्या जोडणीत काही त्रृटी आढळून आल्या आहेत. या सर्व मतदारांची पडताळणी सुरु आहे. मतदारांकडून अथवा त्यांच्या कुटूंबियांकडून गणना प्रपत्र भरून घेतले जात आहे. ते भरून देणे मतदारांना बंधनकारक असणार आहे. ज्या मतदारांची जोडणी झालेली नाही. त्यांना २००२ मध्ये त्यांचे मतदार यादीत नाव कुठे होते हे सांगून केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना ते शोधण्यासाठी मदत करायची आहे. अन्यथा अपात्र मतदारांची नावे मतदान यादीतून वगळली जाणार आहेत.

यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी मतदारांच्या घरी येणे अपेक्षित आहे. पण अनेक ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी मतदारांच्या घरी जाण्या ऐवजी मतदान केंद्रावर अथवा सार्वजनिक ठिकाणी बसून मतदारांना कागदपत्र घेऊन पडताळणीसाठी बोलवत आहेत. त्यामुळे अनेक मतदार या पडताळणीपासून वंचित राहण्याची चिन्ह आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून त्यांच्या संपर्कातील मतदारांना बोलावून घेण्याचे निर्देश दिले जात आहेत. अलिबाग शहर आणि आसपासच्या परिसरात याची प्रचिती येत आहेत. त्यामुळे मतदारांनाच आपले नाव मतदार यादीत कायम रहावे यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मतदार विशेष सखोल पुनरिक्षण मोहीमेचा मतदारांना जाच झाला आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे नाराजी वाढत चालली आहे. पडताळणीची मुदत संपत आली तरी अनेक ठिकाणी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरभेटीवर फिरकलेच नसल्याच्या तक्रारी आहेत. महत्वाची बाब म्हणजे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

सर्व केंद्र स्तरीय मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी किमान एकदा तरी मतदारांच्या घरी भेट देणे आवश्यक आहे. तसे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या संदर्भात काही तक्रारी असतील तर संबधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.- नितिन वाघमारे, जिल्हा निवडणुक अधिकारी रायगड</strong>