अलिबाग : रायगड जिल्ह्यात सन २०२५ मध्ये सरासरी ३ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील २८ धरणे शंभर टक्के जलसाठ्यानी भरून गेली. मात्र मार्च महिना संपत आला असताना २८ धरणात फक्त ४३.४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर ३ धरणात दहा टक्क्यांपेक्षा ही कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्या तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

रायगड जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाच्या अत्यारीत मुरुड (१), तळा (१), रोहा (१), पेण (१), अलिबाग (१), सुधागड (५), श्रीवर्धन (३), म्हसळा (२), महाड (४), कर्जत (२), खालापूर (३), पनवेल (३), उरण (१) या तेरा तालुक्यात २८ धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे. मात्र सध्या या धरणांमध्ये २९.७७१ दलघमी म्हणजे केवळ ४३.४५ टक्के पाणी साठा शिल्लक राहीला आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील ३ धरणांमध्ये दहा टक्क्याहून कमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणी साठ्यांवर अवलंबून असलेल्या गावात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. रायगड जिल्ह्यात सरासरी तीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. पण हे बहुतांश पाणी नद्यांवाटे समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या हिवाळ्यात कोरड्या पडण्यास सुरुवात होते उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.

. गेल्यावर्षी रायगड जिल्‍हयात उत्तम पाऊस झाला होता. धरण भागात उत्तम पाऊस पडल्याने सर्व धरणे ही शंभर टक्के भरली होती. त्यामुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करेल असे वाटत नव्‍हते. परंतु मार्च महिन्‍यातच धरणातील पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची पातळी अजून खाली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

धरणातील जलसाठा कमी झाल्याने पाणी पुरवठा कमी होत आहे. काही ठिकाणी एक दोन दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच पाण्याची चणचण सुरू झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात शाळांना सुट्या सुरू होणार असल्याने चाकरमानी ही गावाकडे परतणार आहेत. मात्र त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

उपलब्ध पाणी साठा

  • ० ते १० टक्के – घोटवडे, ढोकशेत, उन्हेरे
  • ११ ते ३० टक्के – कोंडगाव, कवेळे, रानवली, पुनाडे
  • ३१ ते ५० टक्के – श्रीगाव, फणसाड, पाभरे, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, साळोख, अवसरे, डोणवत
  • ५१ ते ६० टक्के – कार्ले, कुडकी, भिलवले, कलोते-मोकाशी, बामणोली, उसरण
  • ६० ते ८० टक्के – वावा, सुतारवाडी, आंबेघर, संदेरी, मोरबे, उन्हेरे