अलिबाग – रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आता अधिक तीव्र होत असून ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत असल्याने अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. परिणामी महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.सध्या जिल्हयातील २० गावे आणि ८५ वाडया तहानलेल्या असून त्यांना २७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पेण तालुक्यातील वाशी व सारेभाग परिसरात टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. ४ गावे आणि ४८ वाड्यांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या भागात प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला असून सध्या १२ टँकरच्या सहाय्याने नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्याखालोखाल महाड तालुक्यातील ७ गावे आणि ३२ वाडयांना टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. जिल्हयात १०५ गावे वाडया तहानलेली असून जवळपास 36 हजार लोकसंख्येला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
आठवडाभरात १२ टँकरने वाढ
कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ पैकी सात धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला आहे. पाणीपुरवठ्यात २० ते २५ टक्क्यांची कपात करण्यात आली असून अनेक गावांना एक ते दोन दिवसाआड पाणी दिले जात आहे. जसजसा उन्हाळा वाढतो आहे तसतशा टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत चालल्या आहेत. मागील आठवडयात जिल्हयात ७२ गावे वाडया टंचाईग्रस्त होत्या. तेव्हा १५ टँकरने पाणी पुरवले जात होते. आठवडाभरात १२ टँकर वाढवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
पाणीटंचाईचे संकट गडद
जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊनही दरवर्षी पाणीटंचाईचे संकट उभे राहत असल्याने नियोजनाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याने वर्षानुवर्षे त्याच गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षीच्या टंचाईच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जिल्हयातील पाणीसमस्येची भीषणता समोर येते. जून २०२५ अखेर ४३ गावे आणि २४२ वाडयांना टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली होती. मागील वर्षी तबबल ४२ टँकर लागले होते.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना राबवली. परंतु ‘हर घर नल से जल’ देण्याच्या सरकारच्या स्वप्नांना जिल्ह्यात खीळ बसली आहे. १ हजार ४२२ योजनांपैकी तब्बल ६०७ योजना अद्याप अपूर्ण असून मुदतवाढ देऊनही कामे रखडल्याने योजनेचा बोजवारा उडाल्याची टीका होत आहे.
दरवर्षी टंचाईचा सामना करणाऱ्या पेण, खालापूर, रोहा, सुधागड, अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, तळा आणि म्हसळा तालुक्यांसाठी ९.३० कोटींचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधन विहिरी खोदण्याचा समावेश आहे.
दरम्यान, औद्योगिक पाणीपुरवठ्याशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अलिबाग आणि रोहा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एमआयडीसीला तब्बल १३२ कोटी रुपयांची पाणीपट्टी येणे असल्याने आर्थिक व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूणच, पाणीटंचाईच्या वाढत्या संकटामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
