अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाने नावीन्यपूर्ण योजना म्हणून सन 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये ‘अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे’ ही योजना समाविष्ठ केली होती. या योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज, प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्यामधून या योजनेसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून 1,511 पात्र दिव्यांग लाभाथ्र्यांना याचा एकरकमी 16 हजार रुपये लाभ मंजूर करण्यात आला आहे.
सन 2025-26 या वित्तीय वर्षामध्ये रायगड जिल्हा परिषदेने 5 टक्के दिव्यांग कल्याण सेस निधीमधून दिव्यांग व्यक्तींसाठी नावीन्यपूर्ण योजना म्हणून ‘अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे’ या योजनेचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानुसार या योजनेसाठी लाभार्थी निवडीबाबतचे निकष, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इ. निश्चित करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभाथ्र्यांचे दिव्यंगत्वाचे प्रमाण 60 टक्के किंवा 60 टक्केपेक्षा जास्त असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावे. तसेच अर्जदाराकडे केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दिव्यंगत्वाचे यूडीआयडी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अशा प्रकारचे निकष ठरविण्यात आले होते. यानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर पात्र ठरलेल्या एकूण 1,511 लाभाथ्र्यांना प्रति लाभार्थी 16 हजार रुपये रक्कम बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात आलेली आहे.
ज्या पात्र दिव्यांगांनी या योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले होते त्यांनी आपल्या बँक खात्यावर सदरची लाभाची रक्कम जमा झाल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
