अलिबाग- अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण राष्ट्रवादी कांग्रेसचे बहुतांश नेते मुंबईत अडकुन पडले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरेही मुंबईत आहेत. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे देखील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे प्रचारात फारसे सक्रीय झालेले नाहीत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद निवडणूकीपासून सर्वप्रमुख नेते प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे प्रचाराची धुरा उमेदवारांनाच संभाळावी लागत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. चिन्ह वाटप झाल्याने, प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र ऐन प्राचार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हा परिषदेसाठी २९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. उत्तर रायगड मधील कर्जत खालापूर मतदारसंघात पक्षाने शिवसेना ठाकरे गटा सोबत आघाडी केली आहे. तर दक्षिण रायगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती असून ते एकत्रितपणे शिवसेना शिंदे गटासोबत लढत आहेत. श्रीवर्धन, महाड आणि कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघावर पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. पण निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरुवातीला दोन दिवस बारामती मध्ये तर नंतर मुंबईत अडकून पडले. त्यामुळे पक्षाच्या प्रचाराला खीळ बसला.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांना मुंबईत रहावे लागले. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे मंगेश काळोखे हत्त्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या बाहेर फारसे फिरकलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांची कोंडी झाली आहे. नेते उपलब्ध नसल्याने उमेदवारांच्या प्रचार सभा होऊच शकलेल्या नाहीत. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर आणि छोट्या कॉर्नर सभांवर उमेदवारांना भर देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहीला आहे, मात्र प्रचारासाठी नेते उपलब्ध नसल्यने, कार्यकर्ते आणि उमेदवारांची मात्र घालमेल सुरु आहे.