अलिबाग– रायगड जिल्हा परिषद ५९ आणि पंचायत समित्याच्या ११८ जांगासाठी मतदानाच्या प्रक्रीया शनिवारी पूर्ण झाली. आज सोमवारी सकाळी सर्व जागांसाठी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रस्थापित पक्ष आपआपले गड राखणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे वर्चस्व होते. तर पंचायत समित्यांवर शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र शेकापची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आता महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. जुने जाणते नेते पक्षाला सोडून गेल्याने शेकापची ताकद घटली आहे. जिल्ह्यातील राजकीय समिकरणे कमालीची बदललेली आहेत. त्यामुळे बदलत्या राजकीय समितरणांच्या पार्श्वभुमीवर झालेल्या मतदानाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात होती. शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ४० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्याखालोखाल भाजपने ३०, राष्ट्रवादी काँग्रेसने २९, शिवसेना ठाकरे गटाने २०, शेकापने १८, काँग्रेसने ९, मनसेचे ३ तर आप, वंचित बहुजन आघाडी, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष तर अपक्ष २१ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. सर्व उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतदान यंत्रात बंद झाले. ६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी मतमोजणी होणार असल्याने, जिल्हा परिषदेवर सत्ता कोण मिळवणार याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
निवडणुकीच्या निमित्याने जिल्ह्यात स्थानिक पातळ्यावर सोयीस्कर आघाड्यांचा पॅटर्न सर्वच राजकीय पक्षांनी राबविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर रायगडात शिवसेना ठाकरे गटाशी तर दक्षिण रायगडात भाजपशी युती करून निवडणूक लढवली, शिवसेना शिंदे गट उत्तर रायगड मध्ये भाजप सोबत युती करून निवडणूकीत उतरला तर दक्षिण रायगड दोन्ही पक्ष एकमेकां विरोधात होते. अलिबाग मध्ये शेकाप आणि शिवसेना शिंदे गटात प्रमुख लढत होती. मात्र महाड मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूकीला सामोरे गेले. त्यामुळे सोयीस्कर युती आघाडीचा पॅटर्न पुन्हा एकदा पहायला मिळाला.
जिल्ह्यात स्वबळावर सत्ता आणण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात राहिलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर मात्र लवचिक भूमिका घेण्याचे धोरण पक्ष नेत्यांनी स्विकारले आहे. युती आघाडीच्या या सोयीस्कर पटर्नची चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली आहे. राजकीय पक्षांच्या अंतर्गत गुंतागुंतीमुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला हे पहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा मतदारांनी कौल युतीच्या घटक पक्षांच्या बाजून दिला होता. पण नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षच एकमेकांविरोधात लढले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने दिला होता. भाजपची मात्र पिछेहाट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीमधील मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी ३० सदस्य निवडून आणावे लागणार आहे.
जिल्हा परिषद २०१७ मधील पक्षीय बलाबल
- शेकाप २३
- राष्ट्रवादी काँग्रेस १२
- शिवसेना १७
- भाजप ३
- काँग्रेस ३
यंदा शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वाटचालीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण सत्ता स्थापनेसाठी बेरजेच्या राजकारणात या पक्षांची भूमिका महत्वाची ठरू शकणार आहे.
