अलिबाग- रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक प्रस्तापितांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे.

भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलीमा पाटील यांना जांभुळपाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नवख्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांचा आंबेपूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या रसिका केणी यांनी पराभव केला. माजी आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटील आणि मुलगा सवाई पाटील यांचा घोसावळे आणि शहापूर मतदारसंघातून पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला. भाजप आमदार रविशेठ पाटील यांच्या सूनबाई शर्मिला वैकूंठ पाटील यांचाही पराभव झाला. भाजपकडून निवडणूकीत उतरलेल्या सर्वाधिक प्रस्थापितांना पराभवाला सामोरे जावे लागले.

शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या आमदार महेद्र थोरवे यांची सून श्वेता प्रसाद थोरवे यांचा वेणगाव पंचायत समिती मतदारसंघातून पराभव झाला. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या पत्नी सुनीता टोकरे यांचा नेरळमधून पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पचायत समिती सभापती श्रध्दा अकींत साखरे यांचा अत्तरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून पराभव झाला. शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना पराभवाचे धक्के बसल्याचे पहायला मिळाले.