अलिबाग– रायगड जिल्हा परिषदेवरील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस सह शिवसेना शिंदे गटही सत्तेत सहभागी होणार आहे. तिन्ही पक्ष दीड दीड वर्ष अध्यक्षपद वाटून घेणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदा संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीमधील पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापने संदर्भात चर्चा झाली. या चर्चे नंतर जिल्हा परिषदेवर महायुतीने एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपच्या वाटेला तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जाणार आहे. शिवसेनेला सभापती पद मिळणार आहे. 

दीड वर्षानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद शिवसेनेला दिले जाणार आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला तिढा सुटला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणुक झाली होती. या निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढले होते. निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे २१, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले होते.

निवडणुक निकालानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्र येऊन जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले होते. भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला होता. त्यामुळे सर्वाधिक जागा निवडून येऊनही शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. भाजप आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित सदस्य गोव्यात जाऊन बसल्याने, सत्ता स्थापनेच्या चर्चेला खिळ बसला होता. अखेर शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा तिढा सोडविण्याची विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक होऊन रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय झाला.

काल मुंबईत महायुतीच्‍या वरीष्‍ठ नेत्‍यांची बैठक झाली. या बैठकीत राज्‍यातील १२ जिल्‍हा परीषदांमध्‍ये एकत्र काम कसे करता येईल यावर व्‍यापक चर्चा झाली. त्‍यात रायगडचाही विषय चर्चेला आला. यातून सर्वसमावेशक फॉर्म्‍युला कशा पदधतीने करता येईल याचा निर्णय मुख्‍यमंत्री उपमुख्‍यमंत्री घेतील. – सुनील तटकरे, प्रदेशाध्‍यक्ष राष्‍ट्रवादी काँग्रेस 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या टप्प्यात भाजपला दिले जाणार आहे. त्यानंतर शिवसेना आणि शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार आहे. -भरत गोगावले,  मंत्री, रोजगार हमी