अलिबाग – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी (दि. 21) अखेरचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उमेदवारांची झुंबड उडाली होती. गुरूवारी (दि. 22) अर्जांची छाननी केली जाणार आहे. मंगळवारी (दि. 27 ) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढली होती.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १६ जानेवारीपासून सुरूवात झाली. मात्र १८ जानेवारीपर्यंत माघ महिना होता तो अशुभ मानला जात असल्याने उमेदवारांनी १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात केली. त्यातच राजकीय पक्षांनी आपापले उमेदार जाहीर करताना प्रतिस्पर्धी पक्ष कोण उमेदवार देतो याची चाचपणी सुरू ठेवली तसेच युती आघाडयांची गणिते जुळतात का याचाही अंदाज बांधला जात होता. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला.
युती, आघाडीचे प्रयत्न केले जात होते. बंडखोरी टाळण्यासाठी देखील राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला. आज बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. काही उमेदवारांनी अगदी शेवटची १५ मिनीटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वेळ साधताना अनेक उमेदवारांची दमछाक होत होती.
काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता होती राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उशिरा उमेदवारी जाहीर करण्याचा फंडा अवलंबला. शेवटपर्यंत बंडोबाना थंड करण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. उमेदवारी जाहीर होत नसल्याने उमेदवार आणि त्यांचे समर्थक टेन्शनमध्ये होते. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. शेवटी टोकन देऊन उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. ही प्रक्रिया संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरू होती.
राजकीय घडामोडींवर लक्ष
रायगड जिल्हयात यावेळी युती विरूदध आघाडी असे चित्र सध्या तरी दिसते आहे. परंतु काही ठिकाणी विचित्र आघाडया पहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप काही ठिकाणी शिवसेनेबरोबर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी सोबत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. युती आघाडीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही गणिते जुळली तर अर्ज मागे घेतले जातील. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी आहे. तोपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
अलिबागमध्ये १५० अर्ज
अलिबाग तालुक्यात आज शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ५५ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ९५ अर्जांचा समावेश आहे. यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांचीही संख्या मोठी आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज यांची आज छाननी होणार आहे.
