Raigad Election Update: रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हयातील 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली. आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जिल्हा परीषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 16 जानेवारी ते 21 जानेवारी अशी आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा सकाळपासूनच सज्ज होती. निवडणूक नि र्णय अधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. परंतु आज पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नाही.
उद्यादेखील अर्ज दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दुसरीकडे अनेक उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपासून गर्दी होईल, सोमवारपासून बुधवार पर्यंत अर्ज मोठया संख्येने दाखल होतील असा अंदाज आहे.
राज्यात महापालिकांच्या निवडणूका असल्याने बडे नेते त्यात गुंतले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची निश्चिती झालेली नाही.काही ठिकाणी उमेदवारीवरून मतभेद आहेत. महत्वाचे म्हणजे अशुभ मानले जात असल्याने पौष महिन्यात अर्ज दाखल करण्यास उमेदवार किंवा पक्षदेखील राजी नाहीत.
ऑफलाइनमुळे दिलासा
निवडणूकांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागतात. त्यामध्ये सर्व्हर डाऊन, इंटरनेट सेवेचा अडथळा यामुळे उमेदवारांचा बराच वेळ वाया जातो. विशेषतः ग्रामीण भागात ही अडचण अधिक आहे. याबाबतच्या तक्रारी सातत्याने होत असतात. ही बाब लक्षात घेवून निवडणूक आयोगाने केवळ ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
