अलिबाग- रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि जिल्हयातील १५ पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान यंत्रात बिघाड होण्याचे किरकोळ प्रकार वगळता जिल्हयात मतदान शांततेत झाले. जिल्हा परीषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर १५ पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३२९ अशा एकूण ५०२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत सरासरी ६९ टक्के मतदान झाले. आज मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या वेळेत मतदारांचा प्रतिसाद कमी होता. नंतर हळूहळू मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या. पहिल्या दोन तासात ११.५ टक्के तर अकरा वाजेपर्यंत २७.५२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत ४४.८६ टक्के मतदान झाले. साडेतीन वाजेपर्यंत ५७.७७ टक्के मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात साडेपाच वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले.
सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. आपल्या हक्काच्या मतदारांनी लवकरात लवकर मतदान करून घ्यावे यासाठी धावपळ सुरू होती. त्याला बरयापैकी यश आले. सकाळच्या सत्रात बाहेरून आलेल्या स्थलांतरीत मतदारांची मतदानासाठी धावपळ सुरू होती. मतदानाचे कर्तव्य आटोपून त्यांना पुन्हा आपल्या राहत्या गावी, शहरात जायचे असल्याने त्यांनी सकाळीच मतदान करून घेतले.
दुपारी तीन वाजल्यानंतर पुन्हा एकदा मतदानाचा वेग वाढल्याचे पहायला मिळाले. जे मतदार सकाळपासून आपापल्या कामात होते त्यांनी दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. उमेदवारांच्या बूथवर शिल्लक मतदारांची यादी काढण्याचे काम सुरू होते. त्यानुसार त्यांना फोन करून मतदान करण्यासाठी आग्रह धरला जात होता. काही ठिकाणी त्यांना आणण्यासाठी कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचत होते. शेवटच्या दोन तासात मतदानाचा वेग काहीसा मंदावला, त्यामुळे शेवटच्या दोन तासात अपेक्षित मतदान होऊ शकले नाही.
आधी लगीन लोकशाहीचे
आज मतदानाचा दिवस असला तरी लग्नाचाही मुहूर्त होता. त्यामुळे जिल्हयात ठिकठिकाणी लग्नसमारंभ सुरू होते. परंतु बहुतांश नवरदेव आणि नववधूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्यानंतरच त्यांनी बोहल्यावर चढणे पसंत केले. अलिबाग तालुक्यातील नांगरवाडी गावात सचिन धुमाळ या तरूणाचे लग्न संध्याकाळी पनवेल इथं होणार होते. त्याच्या लग्नाची वरात सकाळी थेट मतदान केंद्राबाहेर पोहोचली. नवरदेवाबरोबरच वर्हाडी मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरच संपूर्ण वर्हाड पनवेलकडे रवाना झाले. जिलह्यात ठिकठिकाणी असेच चित्र पहायला मिळाले.
मतदान यंत्रात बिघाड
जिल्हयात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली असली तरी काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार समोर आले. अलिबाग तालुक्यातील सहाण येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्रात बिघाड झाला होता. त्यामुळे सकाळपासूनच रांगेत उभे असलेल्या मतदारांचा काही काळ खोळंबा झाला. तांत्रिक दुरूस्ती करणारे पथक दाखल झाल्यानंतर यंत्रात दुरूस्ती होवून मतदान प्रक्रिया सुरू झाली. महाडच्या सांदोशी येथेही काही काळ मतदान यंत्र बंद पडले होते. एकूण सात मतदान केंद्रांमधील दहा मतदान यंत्रात बिघाड झाल्याने ती बदलण्यात आली.
मान्यवरांचे मतदान
जिल्हयातील लोकप्रतिधींनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. मंत्री भरत गोगावले यांनी खरवली येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब जावून मतदान केले. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी थळ येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बाजावला. खासदार सुनील तटकरे यांनी संध्याकाळी चार वाजता आपल्या कुटुंबासह दुरटोली येथील केंद्रावर मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सकाळीच पेझारी येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
नगर पालिका निवडणुकीतील दंगा लक्षात घेऊन वाढीव पोलीस बंदोबस्त
नगरपालिका निवडणुकी दरम्यान महाड आणि रोहा येथे झालेल्या तंट्यांची दखल घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती.
महाड नगरपालिका निवडणुकी दरम्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. प्रकरण बंदूक रोखण्यापर्यंत गेले होते. रोहा नगरपालिका निवडणुकी दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा खूनही झाला होता. या खून प्रकरणालाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधील वादाची किनार होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या निवडणूक काळात एकूण १५९ पोलिस अधिकारी, १ हजार ८१६ पोलिस कर्मचारी तसेच २ हजार ५८५ होमगार्ड जिल्हाभर तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव दलाच्या तुकड्याही जिल्ह्यात बंदोबस्तासाठी दाखल झाल्या होत्या. दगा काबू पथक आणि शिघ्रकृती दलही तैनात ठेवण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कारवाईवरही पोलीसांनी भर दिला होता. विशेषतः संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मतदानकेंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले होते.

