अलिबाग – रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले आहेत. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेनी महायुतीसाठी व्यापक प्रयत्न सुरू केले असतांनाच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र शिवसेनेला दूर ठेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरूच ठेवल्या आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू केल्याने, शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
रायगड जिल्हा परीषदेची निवडणूक ७ फेब्रुवारीला पार पडली. ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला १५, राष्ट्रवादी कॉंग्रेस १६, शिवसेना शिंदे गटाला २१, शिवसेना ठाकरे गट ५ , कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, मात्र सर्वाधिक जागा निवडून येऊनही शिवसेना जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहण्याची चिन्ह दिसत आहेत.
निवडणुक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल असे जाहीर केले होते. गट स्थापनेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य पंधरा दिवस गोव्यात एकत्रित तळ ठोकून बसले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. स्थानिक नेत्यांशी चर्चेचे मार्ग बंद झाल्याने, शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. एकनाथ शिंदे यांनीही जिल्हा परिषदेत महायुती व्हावी यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे शिवसेनेकडून सातत्याने सांगितले जात असतांनाच, स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेला दूर ठेऊन, सत्तास्थापनेसाठी पाऊले टाकणे सुरूच ठेवले आहेत.
रायगड जिल्हा परीषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक १२ मार्च रोजी होणार आहे. आपलाच अध्यक्ष होणार हे गृहित धरून भाजपाने आनंदोत्सवाची तयारी देखील सुरू केली आहे. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मैदानावर भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू असून त्यासाठी भव्य मंडप उभारला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
१२ तारखेला होणारया निवडणूकीत रायगड जिल्हा परीषदेत भाजप राष्ट्रवादीची सत्ता येईल आणि पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होणार आहे. ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही भाजप – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा त्याच दिवशी आयोजीत केला आहे. त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. -अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस, भाजपा, दक्षिण रायगड
अध्यक्षपदाची निवडणूक १२ तारखेला आहे. तोपर्यंत बरयाच राजकीय घडामोडी होतील काय निर्णय होतो त्याबद्दल आम्ही ११ तारखेला सांगू आणि आमची भूमिका स्पष्ट करू. -भरत गोगावले, मंत्री शिवसेना
