अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वतंत्रपणे गट नोंदणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत असल्याने तिसऱ्या पक्षाला सत्तेत समावून घेण्याची गरज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. तरीपण सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आता शिंदेच्या शिवसेनेनी वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षावर दबाव टाकण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणुक प्रक्रीया नुकतीच पार पडली. महायुतीमधील पक्ष सोयीस्कर युती आघाडी करून एकमेकांविरोधात लढले. शिवसेना शिंदे गटाने २१, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने १६, भाजपने १५, शिवसेना ठाकरे गटाने ५ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या. त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी युती आणि आघाडीची अपरिहार्यता कायम राहिली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
भाजपच्या १५ सदस्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या समोर गट नोंदणी केली. वैकूंठ पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यावेळी उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांची अलिबाग येथे बैठक घेऊन सुचना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्षाचा स्वतंत्र गट नोंदणी केला. जिल्हा परिषदेतील पक्षाचे १६ नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी मधुकर पाटील यांची गटनेते पदी सर्वानूमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तीन सदस्य उपस्थित होते. कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे हे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण तसे झाले नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून नंतर गट स्थापन केला जाईल असे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी निवडणुक निकालानंतर जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच सत्ता स्थापन करेल असे जाहीर केले होते. दोन्ही पक्षाकडे बहुमत असल्याने, तिसऱ्या पक्षाला घ्यायची गरज नसल्याचे जाहीर करून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या गट स्थापनेनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालीनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे सत्तेत वाटा मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाने वरिष्ठ पातळीवरून दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मंत्री भरत गोगावले यांनीही आम्ही सत्तेत सहभागी होऊ असे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने घाई करून गटस्थापना करून घेतली आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी ३० सदस्य संख्या असणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकजे ती संख्या आहे. त्यामुळे त्यांना तिसऱ्या पक्षाच्या मदतीची गरज नाही. पण सत्ता सहभागासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे. त्यांसाठी त्यांनी दबाबतंत्राचा वापर सुरू केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्या या दबावापुढे झुकतात का की दूर्लक्ष करून शिंदेच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
