अलिबाग : रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर अलिबाग समुद्र किनारी आनंदोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेला सुशासन संकल्प सभा असे नाव देण्यात आले होते. परंतु आयत्यावेळी ही सभा रद्द करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि नेते सभेसाठी न थांबताच मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
रायगड जिल्हा परीषदेत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येवून सत्ता स्थापन करणार हे निश्चित मानले जात होते. त्यातच जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच भाजपला मिळणार असल्याने काय्रकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यासाठी अध्यक्ष निवडीनंतर अलिबागेत विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मैदानावर भव्य मंडपदेखील उभारण्यात आला होता.
परंतु निवडणूक बिनविरोध होवूनही आयत्यावेळी ही सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व इतर नेतेमंडळींनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून निघून गेले. त्यानंतर जिल्हा परीषद कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. पण सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता.
विधान भवनातील बॉम्बचा ईमेल, चालू अधिवेशनातील लक्षवेधी व इतर घडामोडीमुळे रविंद्र च्वहाण यांना तातडीने मुंबईत परतावे लागल्याने विजयोत्सव रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परीषदेतील सत्तेत शिवसेनेतील सहभागाबाबत भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यात एका गटाचा शिवसेनेच्या सहभागाला विरोध होता. शिवसेनेला आयत्यावेळी सहभागी करून घेतल्याने हा गट कमालीचा नाराज होता. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्याने अनेक गावातील कार्यकर्ते अलिबागेत आलेच नाहीत. त्यामुळे आजच्या सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही याचा अंदाज आल्याने सभा रद्द करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विजयोत्सवाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र विधानभवनातील बॉम्बसंदर्भातील इमेल व इतर महत्वाच्या घडामोडींमुळे रविंद्र चव्हाण यांना तातडीने मुंबईला जावे लागले. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांच्या संमतीने आजचा आनंदोत्सव मेळावा रद्द करण्यात आला अशी माहिती भाजपचे दक्षिण रायगडचे संघटक सतीश धारप आणि सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी दिली.
