अलिबाग: गेले दोन महिने शांत असणा-या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोमवार (ता.15)पासून पुन्हा एकदा विद्याथ्र्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे. बालकांना शाळेची आवड निर्माण व्हावी व त्यांची उपस्थिती वाढावी याकरीता रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सोमवारी (ता.15) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल तालुक्यातील वहाळ राजिप शाळेत प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून सोमवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘शाळाप्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची पदयात्रा, पालकांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेचा परिसर ग्रामस्थांच्या सहाय्याने स्वच्छ करून शाळा सडा रांगोळी व पानाफुलांनी सुशोभित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 58 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक उपक्रम याच बरोबर मुल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्याथ्र्यांकडे वैयक्तिक लक्ष, 100 टक्के प्रशिक्षित उच्चशिक्षित शिक्षक, तसेच शाळेत विद्याथ्र्यांना मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जातो.
मुलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रतिनीधी, सनदी अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी शाळेस भेट देणार आहेत. बालकांची प्रभातफेरी काढण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित करावे तसेच सोमवारी साज-या होणा-या प्रवेशोत्सवात आपआपल्या परिसरातील शाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार डाॅ. रूपाली सातपुते, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.
‘पहिले पाउल’ संकल्पना राबविणार:
शाळेत आल्यानंतर शाळा विद्यार्थ्यांना आपली वाटावी यासाठी राजिप शिक्षण विभागाकडून ‘पहिले पाउल’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घेऊन त्याची प्रत पालकांना देण्यात येणार आहे. यामुळे आपल्या शाळेचा पहिला दिवस विद्याथ्र्यांच्या कायम लक्षात राहणार आहे.
मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप:
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्याथ्र्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 लाख 256 विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे.यासाठी शिक्षण विभागाने केंद्र स्तरापर्यंत पुस्तके पोहोचतील असे नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती:
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी व ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सोमवारी (ता.15) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल तालुक्यातील वहाळ राजिप शाळेत प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रधान सचिव शालेय शिक्षण रणजीत सिंह देओल, आयुक्त शालेय शिक्षण सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त कोकण रुबल अग्रवाल, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य महेश बालदी, विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रूपाली सातपुते, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
