अलिबाग – शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची निश्चिती दरवर्षी केली जाते. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटते, त्या ठिकाणी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे आवश्यकतेनुसार इतर शाळांमध्ये बदलीद्वारे समायोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या २६ व उर्दू माध्यमाच्या ५ अशा एकूण ३१ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन यशस्वीरीत्या पार पडले.
ही समायोजन प्रक्रिया रायगड जिल्हा परिषद कार्यालय, अलिबाग येथे पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार व सोयीच्या ठिकाणी शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक शिक्षकांना मनासारख्या शाळा मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे सन २०२४ मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातील १० शिक्षण सेवकांची नियुक्ती उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी सुसंगत अशा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. शिक्षकांच्या सोयी, अंतर, गरज आणि उपलब्ध जागा या सर्व बाबींचा विचार करून समायोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी समायोजनाची आवश्यकता स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांचे योग्य वितरण अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी सभापती वैकुंठ पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे तसेच जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनीही या प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर दिला. शिक्षकांना सोयीस्कर व योग्य पर्याय उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
प्रशासनाच्या पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय कवितके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील भूरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) चे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मनासारख्या शाळांमध्ये नियुक्ती मिळाल्याने आनंदित झालेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाचे आभार मानले.
