अलिबाग- स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सीसीटिव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून सर्वच्या सर्व सिसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत.

रायगड प्राधिकरण आणि पुरातत्व विभागाने गडावर विवीध ठिकाणी एकूण ५९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे सर्व कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत. पुर्वी गडावरील हत्तीखान्यात सीसीटीव्ही यंत्रणेचा कन्ट्रोल युनिट बसविण्यात आले होते. याच ठिकाणी पुरातत्व विभागाचे कार्यालय होते. मात्र मागील काही वार्षात गडावर ठिकठिकाणी उत्खनन करण्यात आले. या उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा संग्रह सध्या संग्रहालय स्वरूपात हत्तीखाना परिसरात करण्यात आला आहे. त्यामुळे येथील सीसीटीव्ही कंन्ट्रोल रुम दुसरीकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र नंतर हे काम पूर्णच केले गेले नसल्याची बाब सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा तयारी बैठकीच्या निमित्ताने समोर आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या संयोगिताराजे भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आयोजनानिमित्ताने करायच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यात गडावरील सुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित झाला. पुरात्तव विभाग आणि रायगड प्राधिकारण यांच्यात समन्वय नसल्याने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम रखडले असल्याची गंभीर बाब उपस्थितांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हाधिकारी जावळे यांनी गडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत असणे ही गंभीर बाब असल्याचे म्हणत, पुरातत्वविभाग आणि रायगड प्राधिकारण यांनी तातडीने सर्व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी असे निर्देश दिले.

सीसीटीव्ही यंत्रणा का गरजेची?

२०११ साली वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून असाच वाद निर्माण झाला होता. तेव्हा एका सामाजिक संघटनेनी बळजबरीने घुसून वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून दरीत ढकलून दिला होता. पुरातत्व विभागाने तो पुन्हा काढून बसविला होता. या घटनेनंतर रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसरात कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली होती. पण आता ही यंत्रणा नादूरूस्त असल्याची बाब आता समोर आली आहे. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचा वाद अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गडावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे.

पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सीसीटिव्ही यंत्रणा तातडीने सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यापूर्वी नादुरुस्त यंत्रणा कार्यान्वित केली जाईल – किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड