अलिबाग- राज्य सरकारने रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली आहे. या अंतर्गत आजवर जवळपास २५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या कामांच्या खर्चावरून आणि दर्जावरून प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने, आता किल्ल्याच्या कामांची आयआयटी मुंबईच्या पथकाकडून पहाणी आणि झालेल्या कामांचे परिक्षण केली जाणार आहे.

रायगड किल्ला जतन संवर्धन आणि पर्यटन विकास योजने अंतर्गत राज्यसरकारने ६०६ कोटी रुपयांचा आराखड्याला मंजूरी दिली आहे. यात प्रामुख्याने पुरातत्व विभागामार्फत किल्ल्याच्या परीसराचे जतन व संवर्धन, पाचाड येथील जिजामाता समाधी स्थळ परिसर जतन संवर्धन, पर्यटन विकासाची कामे, गडाच्या पायथ्याशी असलेल्या २१ गावांतील पायाभूत सुविधांचा विकास, भूसंपादन, रज्जू मार्ग आणि महाड ते पाचाड महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण यासारख्या कामांचा समावेश आहे.

या कामांसाठी राज्यसरकारकडून आत्ता पर्यंत २६५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ज्यापैकी २०७ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. ज्यात सार्वजनिक बांधकाम विशेष स्थापत्य विभाग रायगड किल्ला, महावितरण, पुरातत्व विभाग,जलसंधारण विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय महाड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अखत्यारितील कामांचा समावेश होता.

गडावर आणि खाली करण्यात आलेल्या कामांवरून समाजमाध्यमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. गडाच्या पायरी मार्गावरील कामाचा दर्जा योग्य नसल्याची टिका होऊ लागली आहे. स्वच्छता गृहांच्या परिस्थितीबाबतही टीका झाली. त्याच बरोबर कामांच्या खर्चावरूनही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबई आयआयटीच्या पथकांकडून या कामांची तपासणी करून परिक्षण अहवाल घेतला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात मुंबई आयआयटीशी पत्रव्यवहार करून झालेल्या कामांची पहाणी आणि परिक्षण करून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आयआयटी मुंबईचे एक पथक लवकरच गडावरील कामांची पहाणी करून त्यानंतर झालेल्या कामांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. झालेल्या कामांमध्ये काही त्रृटी अथवा दोष आहे का याबाबतचा अहवाल ते सादर करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

रायगड विकासासाठी मंजूर निधी – ६०६ कोटी

आजवर प्राप्त निधी – २६५ कोटी
खर्च झालेला निधी – २०७ कोटी
शिल्लक निधी – ५८.४३ कोटी