अलिबाग : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील महादरवाजा परिसरात पायरी मार्गावर दरड कोसळल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग २४ आणि २५ जून २०२६ या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
मंगळवारी (२३ जून) झालेल्या मुसळधार पावसामुळे महादरवाजाजवळील पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात माती व दगड कोसळून मार्ग अडथळाग्रस्त झाला. त्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागाकडून दरड हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
महाड तहसीलदारांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला. दरड हटविण्याचे काम पूर्ण होऊन मार्ग सुरक्षित घोषित होईपर्यंत पर्यटकांना पायरी मार्गाने प्रवेश दिला जाणार नाही.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना नाणे दरवाजा, चित्त दरवाजा तसेच किल्ले रायगड परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि या कालावधीत पायरी मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करून बंदी असताना पायरी मार्गाचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, ५४ आणि ५६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे रायगड भेटीचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांनी अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
