अमरावती : करोना संकटकाळात बंद झालेल्या अनेक रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात आल्या. पॅसेंजर धावत्या झाल्या, पण अजूनही सर्वाधिक मागणी असलेली अमरावती-जबलपूर आणि अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू होऊ शकलेली नाही. बडनेरा रेल्वे स्थानकावर अजूनही तब्बल आठ रेल्वेगाडय़ांना थांबा नाही. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची अनास्था त्यासाठी कारणीभूत मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात तीन रेल्वे स्थानके असली, तरी रेल्वेसेवा अपुरीच असल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई ते हावडा या रेल्वेमार्गावरील बडनेरा हे महत्त्त्वाचे रेल्वे स्थानक. या रेल्वे स्थानकावरून १८ ते २० रेल्वेगाडय़ा दररोज धावतात. अमरावती रेल्वे स्थानकावरून सध्या तीन एक्स्प्रेस गाडय़ा आणि एक मेमू ट्रेन सुटते. नरखेडला जोडणाऱ्या नवी अमरावती या रेल्वे स्थानकावरूनही तीन गाडय़ा धावतात. तरीही हजारो अमरावतीकरांचा रेल्वे प्रवास खडतर बनला आहे.

अमरावती-नागपूर मार्गावर दैनंदिन कामासाठी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांना सोयीचे व्हावे, म्हणून अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसच्या वेळेविषयी तक्रारी समोर आल्या. भल्या पहाटे सुटणारी ही इंटरसिटी गैरसोयीची वाटू लागली. बडनेरा रेल्वे स्थानकाबाहेरून जाणारा नवीन रेल्वेमार्ग (कॉर्ड लाइन) सुरू झाल्यावर वेळेत सुधारणा झाली. प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागलेला असतानाच करोनाकाळात ही इंटरसिटी बंद करण्यात आली आणि अजूनही ही रेल्वेगाडी सुरू होण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत.

हीच अवस्था अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसची. चाकरमाने आणि व्यावसायिकांसाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची मानली गेली. नागपूर आणि मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीच्या ठरलेल्या या गाडीला बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासन टपूनच होते, असा प्रवासी संघटनांचा आरोप आहे. करोनाचे कारण दाखवून ही एक्स्प्रेस बंद करण्यात आली आणि आता ही एक्स्प्रेस सुरू करण्यात येऊनही ती नागपूपर्यंतच धावते.

रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी निवेदने सादर करूनही याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आणि शून्याधारित वेळापत्रकाच्या (झेडबीटीटी) संशोधनानंतर वर्धा ते नागपूरदरम्यान ‘कॉरिडॉर ब्लॉक’वर प्रभाव पडत असल्याने जबलपूर ते नागपूर या एक्स्प्रेसचा अमरावतीपर्यंत विस्तार करणे सध्या व्यवहार्य नसल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाने हात झटकले आहेत. यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. याशिवाय बंद झालेल्या पॅसेंजर गाडय़ाही पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली नाहीत. पुणे येथे ये-जा करण्यासाठी केवळ एकच रेल्वेगाडी उपलब्ध आहे. पुण्यासाठी दररोज धावणारी एक्स्प्रेस सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. 

बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर हावडा ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या तब्बल आठ रेल्वेगाडय़ा थांबत नाहीत. त्यात कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी, टाटानगर अंत्योदय, पुरी-सुरत, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस, पुरी-गांधीधाम, पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस, हावडा-शिर्डी, पुणे हमसफर या एक्स्प्रेस गाडय़ांचा समावेश आहे. यातील काही रेल्वेगाडय़ा या गोंदिया, वर्धा, अकोला या ठिकाणी थांबतात; पण बडनेरा स्थानकाला तेही भाग्य मिळू नये, ही शोकांतिका असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अचलपूर ते मुर्तिजापूपर्यंत धावणारी शकुंतला नॅरोगेज रेल्वे २०१९ मध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आली. ही रेल्वे पुन्हा सुरू व्हावी, यासाठी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह सुरू करण्यात आला असून स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे याकडेही लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष दिलेले नाही.

दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा बहुप्रतीक्षित रेल्वेमार्ग सुरू झाला खरा; पण अजूनही या रेल्वेमार्गावर नरखेड-काचिगुडा, डॉ. आंबेडकर नगर-यशवंतपूर, जयपूर-सिकंदराबाद या तीनच एक्स्प्रेस गाडय़ा धावत आहेत. अमरावतीला जोडणाऱ्या मार्गावरून रेल्वेगाडय़ांची संख्या वाढवावी. बडनेरा, अमरावती आणि नवीन अमरावती या रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत खासदार नवनीत राणा यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असा प्रवासी संघटनांचा आरोप आहे. अमरावती-जबलपूर, नागपूर इंटरसिटी या रेल्वेगाडय़ा तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला आधुनिक डबे जोडल्यास या रेल्वेगाडीची प्रवासाची वेळ कमी होऊ शकेल. अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या मान्य न झाल्यास ‘रेल रोको’ आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. – अनिल तरडेजा, अध्यक्ष, महानगर यात्री संघ

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway administration neglects amravati zws
First published on: 17-05-2022 at 00:07 IST