अर्थसंकल्पाच्या वेळी रेल्वेची भाववाढ झाली असती तर त्यावर चर्चा करता आली असती. मात्र, अचानक करण्यात आलेल्या या दरवाढीचे समर्थन करता येणार नाही, असे मत खासदास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. सामाजिक संकेतस्थळावरून कार्यकर्त्यांनी कसा प्रचार करावा, या विषयीचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त त्या शहरात आल्या होत्या.
 मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून त्यावर बोलणे उचित होणार नाही, असे सांगत आघाडी सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखाच विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा असेल, असे त्या म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात विजयी होताना कमी झालेल्या मताधिक्याचे आत्मपरीक्षण करणार असल्याचेही त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत जाहिरातीवर खर्च करण्यासाठी राष्ट्रवादीची तरतूद कमी होती. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी होईल, तेवढे प्रयत्न करणार आहोत. विशेषत: यापुढे टीका करणाऱ्यास प्रतिवाद केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. राज्यात काँग्रेसमध्ये जसे बदलाचे वारे सुरू आहे, तसेच ते राष्ट्रवादीतही आहे काय, प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत काय, या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देताना त्या म्हणाल्या, असे काही सुरू असल्याचे तुमच्याकडूनच समजते आहे. रेल्वेची दरवाढ हा संयुक्त पुरोगामी सरकारने घेतलेला निर्णय होता, त्याची अंमलबजावणी करतो आहोत, असे भाजपकडून सांगितले जात आहे, त्यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, जर तसा निर्णय घेतला असता तर त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, याचा अर्थ तो निर्णय घ्यायचाच नव्हता, असेच म्हणावे लागेल, असेही खासदार सुळे म्हणाल्या.