सोलापूर : करोनाचे भयसंकट दूर करण्यासाठी धावून आलेल्या रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी रेल्वेने सोलापूरसाठी ९८.३८ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध करून दिला.

ओडिशातील अंगुल येथून गेल्या १९ मे रोजी मध्यरात्रीनंतर सोलापूरसाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ रवाना झाली. यात आठ टँकरमधून ९८.३८ मे. टन प्राणवायू भरण्यात आला होता. ही ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ सायंकाळी पाच वाजता सोलापूरजवळ बाळे स्थानकात पोहोचली. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी ही माहिती दिली.

सोलापुरात सध्या करोनाचे भयसंकट कायम असून विविध ५० रुग्णालयांमध्ये सुमारे दोन हजार खाटा करोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत.

परंतु रुग्णांना आवश्यकतेनुसार प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सोलापूरसाठी एकाचवेळी आठ टँकरच्या माध्यमातून ९८.३८ मे. टन प्राणवायूचा पुरवठा केला आहे.