नांदेड : जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, दुबार पेरणीचे संकटही टळले आहे. पावसाने नांदेड शहरात जनजीवन विस्कळीत झाले.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी तत्काळ पेरणी केली; पण पेरणीनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होता. वेगवेगळ्या भागांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही.
नांदेड शहरात ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. काही मुख्य मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. शिवाय सखल भागात पाणीच पाणी साचले. उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या वसंतनगर, शाहूनगर, आनंदनगर या भागातही रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाय सखल भाग म्हणून ओळखल्या जाणारा प्रभातनगर, नंदीग्राम हाऊसिंग सोसायटी, लालवाडी, श्रीनगर, कलामंदिर या भागातही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.
हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवस पिवळ्या रंगाचा सावधानतेचा इशारा सोमवारी दिला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. पुढील तीन दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संततधार पावसामुळे माहूर, किनवट, देगलूर या भागातील लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत काहीअंशी वाढ झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.