अवकाळी पाऊस व गारपिटीचे थमान जिल्ह्यात सुरूच आहे. शुक्रवारनंतर शनिवारी सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस बरसला. कळंब परिसरात गारांचा पाऊस झाला. वीज कोसळून कळंब तालुक्यातील जवळा येथील तरूण शेतकरी नेताजी शिवाजी लोमटे यांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारीपासून सुरू असलेले अवकाळी पाऊस व गारपिटीचे सत्र मे महिना उजाडला तरी सुरूच आहे. भूम तालुक्यातील हाडोंग्री व आनंदवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. भूम तालुक्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहिले. भूम शहराच्या पूर्वेस गालीबनगर परिसरात काही घरांवरील पत्रे वाऱ्याने उडून गेले. या भागातील जनावरांच्या गोठय़ाचेही नुकसान झाले. भूम-वाशी रस्त्यावरील जुन्या जकात नाक्याजवळ बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक शनिवारी दुपापर्यंत एकेरी होती.
भूम तालुक्यातील हाडोंग्री गावात वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. गावातील सुमारे १५० घरांवरील पत्रे उडाले. जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याच्या गंजीतील पेंढय़ा वाऱ्यामुळे उडून गेल्या. गावातील जि. प. शाळेवरील पत्रेही उडाले. हे पत्रे शाळेपासून शंभर फूट अंतरावर दररथ तळेकर यांच्या वाडय़ात जाऊन पडले. शिवारातील आंबा, डाळिंब, तसेच इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. गावालगत बाळासाहेब हाडोंग्रीकर यांच्या दूध प्रकल्पाच्या शेडचेही नुकसान झाले. गाईसाठी तयार केलेले गोठय़ावरील पत्रे उडाले. गावाला वीजपुरवठा करणाऱ्या जनित्राला आधार देणारे दोन्ही खांब तुटल्याने हे जनित्र कोसळले. त्यामुळे हाडोंग्रीला शुक्रवारपासून वीजपुरवठा बंद आहे.
भूम तालुक्यातील आनंदवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी थमान घातले. अनेक घरांवरील पत्रे, कडब्याच्या गंजी उडून गेल्याने नुकसान झाले. शनिवारी भूम शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या एटीएम केंद्रावर झाड पडले. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या घरावरही झाड कोसळल्याने पडझड झाली. उस्मानाबाद तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुळजापूर, लोहारा, वाशी तालुक्यांतही वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.
मुखेडमध्ये वीज कोसळून महिलेचा मृत्यू, १ जखमी
वादळी पावसात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू, तर दुसरी महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे घडली.
अनसूया चंदर राठोड (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून, माजी आमदार किशन मक्काजी राठोड यांची ती स्नुषा आहे. अनसूया व कांताबाई किशन राठोड (वय ६४) या दोघी दुपारच्या वेळी शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगांची काढणी करीत होत्या. पावणेदोनच्या सुमारास अचानक वादळी वारे व पाऊस सुरू झाला. त्यामुळे या दोघी झाडाखाली आश्रयाला थांबल्या. मात्र, दोनच्या सुमारास वीज कोसळून या दोघी जखमी झाल्या. यातील अनसूया यांचा उपचारार्थ दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कांताबाई यांची प्रकृती स्थिर असून मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी आमदार सुभाष साबणे, मुखेडचे डॉ. दिलीप पुंडे, माजी नगराध्यक्ष बाबूराव बेबडवार, तहसीलदार एस. पी. घोळवे आदींनी घटनास्थळी भेट देऊन राठोड कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, मुखेड तालुक्यातीलच मुक्रामाबादजवळील कलंबर गावात शुक्रवारी वीज कोसळून तीनजण किरकोळ जखमी झाले.