परभणी जिल्ह्यात मोठय़ा प्रतीक्षेनंतर पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळी जिल्हाभरात सर्वत्र पाऊस झाला. हा पाऊस फारसा जोमदार नसला तरी या पावसाने आपली सलामी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या आहेत. रात्री १८.४१ मिमी पाऊस झाला असून आजपर्यंत सरासरी ३३.३० मिमी पाऊस झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाची सरासरी अतिशय कमी असून गतवर्षी जून महिना अर्धा संपल्यानंतर सरासरी ८० मिमी पाऊस झाला होता. यावर्षी मृग नक्षत्र सुरू झाले तरीही पावसाचा पत्ता नव्हता. विशेषत: गेल्या दोन ते तीन दिवसांत कमालीचा उकाडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वचजण पावसाच्या प्रतीक्षेत होते. आणखी दोन दिवसांनी मृग नक्षत्र संपून रविवारपासून आद्र्रा नक्षत्र लागत आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीचे बारा-तेरा दिवस कोरडेच गेले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मात्र ढगाने आकाशात गर्दी केली व रात्री सातच्या सुमारास काही ठिकाणी पावसास सुरुवात झाली. हा पाऊस जवळपास मध्यरात्रीपर्यंत चालू होता. त्यामुळे तापमान कमी झाले असले तरी वादळी वाऱ्यामुळे परभणी शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी उकाडा असाह्य झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा उकाडा जाणवत असे. सर्वानाच मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे.
परभणी जिल्ह्यात सरासरी १८.४१ मिमी पाऊस झाला. परभणी तालुक्यात २०, पालम १६, पूर्णा १३, गंगाखेड २३, सोनपेठ १८.५, सेलू २८.२०, पाथरी १६, जिंतुर ५, मानवत २६ इतका पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु खरिपाच्या पेरणीसाठी मोठय़ा पावसाची आवश्यकता आहे. हा पाऊस झाल्यानंतर पेरणीला वेग येईल. ओलिताखालील कापसाची लागवड झाली असली तरी अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. निर्धास्तपणे पेरण्या सुरू कराव्यात, असा समाधानकारक पाऊस अजूनही झालेला नाही. कोरडवाहू कापूस, सोयाबीनची पेरणी अजूनही सुरू झालेली नाही. सध्या झालेल्या पावसाने केवळ शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र उंचावली आहे. त्याचबरोबर मृग बरसल्याने शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
लातूरमध्ये मृगाच्या हलक्या सरी
 मृग नक्षत्राच्या शेवटच्या चरणात लातूर जिल्हय़ात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ व रेणापूर भागात गुरुवारी सायंकाळी हलका पाऊस झाला. शुक्रवारी अधूनमधून आभाळ भरून येत होते. सायंकाळी ४ नंतर लातूर शहरात हलक्या सरी सुरू झाल्या. गुरुवारी उस्मानाबाद जिल्हय़ात चांगला पाऊस झाल्यामुळे लातूरकरांना पावसाची अपेक्षा होती, ती काहीअंशी पूर्ण झाली. जळकोट, देवणी, वलांडी, आदी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे त्या भागातील शेतकरी पेरणीचे धाडस करण्यास सुरुवात करत आहे. १०० मि.मी. पाऊस होईपर्यंत सोयाबीनचा पेरा करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी चाढय़ावर मूठ धरायला तयार नाही.