राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस; दोन दिवसांत तापमान वाढीची शक्यता

शनिवारी राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

(संग्रहित छायाचित्र)

दोन दिवसांत तापमान वाढीची शक्यता

पुणे : मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी १७ ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारी (१६ ऑक्टोबर) विदर्भ आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस पडला. दोन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने दिवसाच्या तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातून मोसमी वारे निघून गेले आहेत. मात्र, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यात काही ठिकाणी होतो आहे. मराठवाडय़ातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्य़ांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. १७ ऑक्टोबरलाही विदर्भात चंद्रपूर, अकोला जिल्ह्य़ासह इतर जिल्ह्य़ांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, नगर आदी जिल्ह्य़ांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या तापमानात वाढ होत आहे. एक ते दोन दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहणार आहे. त्यानंतर हवामान कोरडे होईल. उत्तरेकडील राज्यात दोन दिवस पाऊस होणार असून, तेथेही नंतर कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. परिणामी राज्यातील काही भागात दिवसाच्या कमाल तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rain with thunderstorms in some parts of the maharashtra zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या