सुमारे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गुरुवारी दिवसभर जोरदार सरींनी हजेरी लावली.   यंदाच्या मोसमातील सरासरी तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा जोर ओसरला होता. गेल्या ३ ऑगस्टनंतर सलग काही दिवस उघडीप राहिली, तसेच अधूनमधून एक-दोन जोरदार सरी पडत राहिल्यामुळे खास श्रावण महिन्याचे वातावरण निर्माण झाले. पण काल संध्याकाळपासून जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. विशेषत: गुरुवारी सकाळपासून त्याचा जोर वाढला आहे. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये पुन्हा एकवार पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.     जिल्ह्य़ात आजअखेर ३६७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरी (३३६४ मिमी) यापूर्वीच ओलांडली गेली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या वार्षिक सरासरीपेक्षाही सुमारे १०० मिमी पाऊस जास्त झाला आहे. पावसाचा अजून सुमारे सव्वा महिना बाकी असून या काळात ९६ टक्के पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्य़ातील पावसाच्या वार्षिक सरासरीबाबत नवा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता आहे.      दरम्यान, मध्यंतरीच्या काळात पावसाने दिलेली उघडीप भातपिकाच्या वाढीच्या दृष्टीने उपकारक ठरली आहे. या पुढील काळातही अशा प्रकारची उघडीप अधूनमधून आवश्यक आहे.