यंदाच्या हंगामात पावसाने रायगडात सरासरी गाठली असली तरी शेतकरी मात्र चिंतातुर झाला आहे. जिल्ह्य़ात ३१ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात शेतीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
रायगड जिल्ह्य़ात जून आणि जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाही चांगला पाऊस झाला. या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी १०४.४ टक्के पाऊस पडला. जिल्ह्य़ाचे पर्जन्यमान सरासरी ३०३८ मिलिमीटर आहे. हा आकडा पावसाने या वर्षी ऑगस्ट महिन्यातच पार केला. जिल्ह्य़ात ३१ऑगस्टपर्यंत सरासरी ३१७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक पावसाची नोंद उरण तालुक्यात, तर सर्वात कमी पावसाची नोंद सुधागड तालुक्यात झाली आहे. इथे अनुक्रमे सरासरीच्या १४६ आणि ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
यंदा पाऊस मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दाखल झाला होता. दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी पेरण्या होऊ शकल्या होत्या. तर काही ठिकाणी रोपे कुजली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. पेरणी उशिरा केल्याने लावणीची कामेही खोळंबली होती. यानंतर मात्र भातशेती सर्व अडचणींवर मात करत जोमाने वर आली होती. त्यामुळे चांगल्या पिकाची अपेक्षा शेतक ऱ्यांनी बाळगली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.हळवी आणि निमगर्वी भातशेती सध्या पोटरी भरण्याच्या अवस्थेत आहे. तर गर्वी भातशेती पोटरीत येण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पोटरीत दाणे भरण्यासाठी भातशेतीला पावसाची गरज भासणार आहे. कडक ऊन पडण्यास सुरवात झाल्याने शेतातील पाणी कमी होण्यास सुरवात झाली आहे. याचा परिणाम दाणे भरण्यावर होणार आहे. याशिवाय भात पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.