आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने विदर्भात सुमारे ५० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून नागपुरात दररोज रात्री वादळी वाऱ्यांसह पाऊस तर विदर्भातील इतर शहरातसुद्धा गारांसह पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. इतर शहरांना पावसाने विश्रांती दिली असली तरीही मंगळवार सकाळपासूनच नागपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
बेमोसमी पावसाचा फटका संपूर्ण राज्यालाच बसत असला तरीही विदर्भात पावसाने गेल्या आठ दिवसांपासून ठाण मांडले आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा शहरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरीही ढगाळ वातावरण कायम आहे. नागपुरात दररोज रात्री सात वाजेपासून वादळी वारे आणि आठ वाजेपासून पाऊस असेच समीकरण गेल्या चार दिवसांपासून तयार झाले होते. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि दुपारी १२च्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. दिवसासुद्धा नागरिकांनी दिवे लावूनच वाहन चालविणे पसंत केले. चंद्रपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असून आधी पाऊस तर आता विजांनी शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मुंबईतही पावसांच्या सरी
मुंबई : मुंबईत मंगळवारी भर दुपारी दादर, शीव तसेच उपनगरांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. ठाणे तसेच नवी मुंबईत काही ठिकाणी जोरदार सरीही आल्या. कोकणातही पावसाच्या सरी आल्या.

कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी
मार्चमध्ये ४० अंश से. पेक्षा अधिक नोंद झालेले कमाल तापमान एप्रिलमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे व बाष्पात झालेली वाढ यामुळे शहरातील कमाल तापमानात घट झाली आहे. बुधवारी कुलाबा येथे ३३.४ तर सांताक्रूझ येथे ३१.८ अंश से. तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात मात्र फारसा फरक पडलेला नसून ते २३ ते २४ अंश से. दरम्यान राहिले आहे.

महावितरणचे ५०० खांब कोलमडले
िहगोली : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकांची वाट लागली. तर महावितरणचे ५०० च्या वर खांब वाकले, पडले. काही ठिकाणी जनावरांच्या अंगवार वीज पडल्याने तर अनेक ठिकाणी घरावरील
पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत.