बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला असून रत्नागिरी जिल्ह्यात कापणीला आलेली सुमारे ३० टक्के भातशेती पावसाच्या पाण्यामुळे बाधित झाली आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली आणि रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला. मात्र पूर-पावसामुळे इतर नुकसान फारसे झालेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर, तर नाचणीचे ९ हजार हेक्टर आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी हाताशी आलेले पीक आडवे झाले आहे. लोंबी वाढल्यावर पिकाची मूळ कमकुवत झालेली असतात. मुसळधार पावसामुळे ती आडवी झाली असून सुमारे ४८ तासाहून जास्त काळ पाण्यात राहिल्याने पुन्हा रुजण्याची भीती आहे.

अर्जुना नदीला आलेल्या पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत घुसले. जवाहर चौकातील काही टपऱ्या पाण्याखाली गेल्या. कोदवली नदीच्याही पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीच्या काठावरील शिवाजी पथ मार्गावरील टपऱ्या, दुकाने, कोंढेतड आणि वैशपायन पूल, बंद धक्का आणि वरची पेठ परिसर पुराच्या पाण्याखाली गेला. व्यापारी सतर्क झाले होते.

लांजा तालुक्यातील दाभोळे कुरचुंब येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे पाणी रस्त्यावर आल्याने दाभोळे-लांजा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. ओढय़ाला नदीचे रूप आले होते. पुराचे पाणी काठावरील भातशेतीमध्ये घुसले होते. रत्नागिरी तालुक्यात काजळीच्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले. पावसाला भरतीची जोड मिळाल्याने सुमारे पाच तास पुराचे पाणी स्थिर होते. हरचिरी, चिंद्रवली, पोमेंडी, सोमेश्वर येथील भातशेती पाण्याखाली होती.

बंगालच्या उपसागरातून पट्टा अरबी समुद्राकडे सरकत जात होता तसा रत्नागिरी, लांजा, राजापुरातील पावसाचा जोर ओसरत होता. संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगडमध्येही दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात होती. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळ आंबेड, तळेकांटे, बावनदी दरम्यान दरड कोसळली. मुसळधार पावसातही ती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तसेच नदीचे पाणी महामार्गावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. खेड पन्हाजे येथील रस्ता पावसामुळे खचल्याने एकेरी वाहतूक सुरू होती.

वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून मच्छीमारी पूर्णत: ठप्प झाली आहे. गेले तीन दिवस सर्व नौका बंदरातच विसावलेल्या आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मुंबई, हर्णेसह गुजरातमधील शेकडो नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगड, लावगण किनाऱ्यांवर आश्रयासाठी आलेल्या आहेत. काही नौका आंजर्ले खाडीत आश्रयाला दाखल झाल्या. काही नौका दिघी आणि जयगड बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईसह गुजरातमधील शंभरहून अधिक नौकांनी जयगड, लावगण बंदराजवळ आश्रय घेतला आहे.

दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४१.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ९  तालुक्यांपैकी  रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक, ५६.३ मिलिमीटर पाऊस पडला असून, संगमेश्वर (५५.८), लांजा (४८) आणि गुहागर  (४६.१ मिमी)  याही तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठय़ा सरी कोसळल्या. पावसाचा हा जोर उद्या, शुक्रवारपर्यंत राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.