मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील जुन्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी साठवणूक (रेनवॉटर हार्वेस्टिंग), घनकचरा व्यवस्थापन, गाळ व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यासाठी परवानगी देण्याची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित केली आहे. यामुळे जुन्या इमारतींमध्ये नवीन नळ, जलनिस्सारण जोडणी यांसारख्या सुविधा देण्याचा मार्गही सुलभ होणार आहे.
नगरविकास विभागाने यासंदर्भात आदेश काढला असून यात जुन्या इमारतींमधील अशा सुविधांसाठी परवानगीची प्रक्रिया निश्चित केली आहे. जुन्या इमारतींमध्ये नवीन नळजोडणी किंवा जलनिस्सारण जोडणीसाठी अर्ज करताना संबंधित इमारतीची बांधकाम परवानगी आणि वैध स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा किंवा जैव-गाळ व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध आहे का, या व्यवस्थेमुळे इमारतीला किंवा परिसरातील अन्य इमारतींना धोका निर्माण होणार नाही ना, तसेच आधीच्या नळ, जलनिस्सारण, वीज आणि गॅस जोडण्यांना नुकसान होणार नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे.
अभियंत्यांकडून तपासणी
संबंधित महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगरपंचायतीतील अभियंत्यांवर तपासणीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बांधकाम परवानगी, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, उपलब्ध जागा आणि प्रस्तावित व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची पाहणी करून अभियंता आपला अहवाल देईल. अहवालातील कोणत्याही बाबीबाबत नकारात्मक निष्कर्ष असल्यास कारण नमूद करून परवानगी नाकारता येणार आहे. अभियंत्याचा अहवाल समाधानकारक असल्यास अर्जदाराकडून भविष्यात या कामामुळे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी स्वीकारण्याचे बंधपत्र घेण्यात येईल.
रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा घनकचरा, जैव -गाळ व्यवस्थापनाची व्यवस्था केल्यानंतर अभियंता पुन्हा पाहणी करून काम योग्यरीत्या झाल्याचा अहवाल देईल. याच्या आधारे सक्षम प्राधिकाऱ्याकडून नवीन नळजोडणी, जलनिस्सारण जोडणी किंवा तत्सम सुविधा देण्यास परवानगी दिली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) मधील संबंधित तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असेल.
