महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठीचे त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही. अशातच महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नसल्याची बाब समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्यातील मुस्लिम नेत्यांना विधानसभा आणि विधान परिषदेवर संधी देऊन मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व निर्माण करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत हे विधान परिषदेतील दोन आमदार निवृत्त होत असल्यामुळे विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधींची संख्या शून्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रईस शेख यांनी पत्रात म्हटलं आहे की “महाराष्ट्राच्या विधान परिषदेला शंभर वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. राज्यात ११.५६% मुस्लिम लोकसंख्या आहे. मात्र विधान परिषदेत मुस्लिम प्रतिनिधित्व आजपर्यंत अत्यंत अल्प राहिलेलं आहे. २७ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत निवृत्त होत आहेत. त्यामुळे विधान परिषदेत असलेलं मुस्लिम प्रतिनिधित्व आता संपुष्टात येणार आहे. १९३७ मध्ये राज्यात द्वी- सभागृह पद्धती अस्तित्वात आली. तेव्हापासून आजपर्यंत या ज्येष्ठ सभागृहात मुस्लिम प्रतिनिधित्व कायम राहिलेले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या ज्येष्ठ सभागृहात मुस्लिम प्रतिनिधित्व संपुष्टात येणे हे काही शोभणारे नाही.”

रईस शेख म्हणाले, “राज्यात १४ लोकसभा मतदारसंघात मुस्लिमबहुल मतदार असतानाही नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून, म्हणजेच १९६० पासून महाराष्ट्रातून ५६७ खासदार निवडून गेले, त्यामध्ये मुस्लिम समाजाला अवघे १५ (२.५%) इतकं अल्प प्रतिनिधित्व लाभलं आहे. विधानसभेत आज अवघे १० मुस्लिम सदस्य आहेत. राज्याच्या ११ कोटी लोकसंख्येमध्ये १० पैकी एक मुस्लिम मतदार असतानाही मुस्लिम प्रतिनिधित्वाची राज्य विधानसभेत इतकी विदारक स्थिती आहे.”

हे ही वाचा >> “दिवा विझताना फडफडतो, तशी शिंदे सरकारची अवस्था”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “बादशाहच्या मनात आलं तर…”

“राज्यातील मुस्लिम जनता एमआयएमकडे झुकण्याची भीती”

शेख यांनी पत्रात लिहिलं आहे की “विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यातील एकही जागा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मुस्लिम समाजाला दिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या आगामी रिक्त जागा भरताना महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व देऊन आपली चूक सुधारायला हवी. मुस्लिम समाजाला राजकीय प्रतिनिधित्व नाकारून महाविकास आघाडी मुस्लिम मताचे ध्रुवीकरण करण्यात हातभार लावणाऱ्या एएमआयएम सारख्या पक्षाकडे मुस्लिम समाजाला ढकलत आहे. म्हणून विधान परिषदेत मुस्लिम समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व द्यावे, अशी आघाडीच्या नेत्यांकडे आग्रही मागणी आहे. त्यास आपण योग्य प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rais shaikh says there is no single muslim mla in maharashtra legislative council asc
Show comments