Uddhav, Raj Thackeray victory rally Video : राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश राज्य सरकारने रद्द केले आहेत. यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माम सेनेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडणार आहे. यानिमित्त तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (राज व उद्धव ठाकरे) एकाच मंचावर एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान या मेळाव्याला पोहचलेल्या मोहन यादव यांनी दोघे बंधू एकाच मंचावर एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या दोघांना एकत्र व्हायला १९ वर्षे लागली, त्याचं वाईट वाटतंय. पण होऊद्या, १९ झाले तरी… आता राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी आमच्या कुटुंबाची आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. उद्धव साहेबांचा स्वभाव जरा हलका आहे, ते जास्त बोलू शकत नाहीत. त्यांना (सत्ताधाऱ्यांना) सरळ करणारा माणूस… जसं बाळासाहेबांचा शब्द आहे, नडाल की तोडला ते राज ठाकरेच करू शकतात.”
उद्धव यादव या तरूण शिवसैनिकाने या प्रसंगी भारतीय जनता पक्षावर टीका केली. तो म्हणाला की, “मी गेल्या २७ वर्षांपासून मुंबईला येत आहे. आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार होत आहे, त्यासाठी १९ वर्ष लागले. आज खूप महत्त्वाचा क्षण आहे. जे आजपर्यंत लोक दोन भावांना एकत्र होऊ देत नाहीत याला कारणीभूत एकच ते म्हणजे बीजेपी. कोणाला एकत्र होऊ द्यायचं नाही, फक्त भांडायला लावायचं हा भाजपाचा पहिल्यापासून फंडा आहे. जे लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांना ओढून घ्यायचं आणि त्यांना मंत्रीपदं द्यायची ही भाजपची पद्धत आहे. आज ठाकरे ब्रँडला ते घाबरले आणि हिंदीचा जीआर रद्द करावा लागला हीच ठाकरेंची पॉवर आहे.”
“आज संबंध महाराष्ट्राची ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि ठाकरे बंधूंनी सत्तेच्या चाव्या घ्याव्यात अशी इच्छा आहे,” असे एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.
कसा असेल कार्यक्रम?
दरम्यान आजच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाची माहिती देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले, “राज्यातील मराठी जनतेला उद्धव व राज ठाकरे यांनी एकाच मंचावर एकत्र येऊन दिशादर्शन करावं ही मराठी बांधवांची भूमिका आहे. त्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं आहे. सकाळी ११.३० वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल. इथे कुठलाही गाण्याचा कार्यक्रम होणार नाही. या कार्यक्रमासाठी भव्य मंच आणि हजारो लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला महाराष्ट्राचं राज्यगीत वाजवलं जाईल. त्यानंतर वरळी येथील कोळी बांधवांचं बँड पथक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवेल.”
संजय राऊत म्हणाले, “आम्ही राज्यातील अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. मोठे नेते आले तर ते देखील या मंचावरून मराठी जनतेला संबोधित करतील. अजित भुरे हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. अत्यंत आटोपशीर व सुटसुटीत असा कार्यक्रम होत आहे. सभागृहाच्या बाहेरही मोठ्या स्क्रीन लावल्या आहेत, जेणेकरून बाहेर जमलेले लोकही हा कार्यक्रम पाहू व ऐकू शकतील.”