पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेला राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेकांना लुटलं, असा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आता एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात काही देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाजेचे साहेब पण सहभागी आहेत का? अशा शंका त्यांनी उपस्थित केल्या आहेत.

भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी याविषयीचं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ४ फेब्रुवारी २०२१मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. मुंबईतल्या मड भागात ग्रीनपार्क या बंगल्यात पॉर्न फिल्मचं चित्रीकरण होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला होता. त्यावेळी गुन्हे शाखेत सचिन वाझे हे वसुलीबाज अधिकारी होते. तेव्हा ९ लोकांना अटक करण्यात आली होती आणि १० वा होता राज कुंद्रा. पण त्याला अटक करायला ५ महिने १५ दिवस का लागले? त्याला कोण वाचवत आहे? वाझे आणि राज कुंद्रा या दोघांच्यात काही बोलणं, भेटणं किंवा देवाणघेवाण झाली आहे का? या गोरखधंद्यात वाझेचे साहेब पण सहभागी होते का? कोणाच्याही आशिर्वादाशिवाय कुंद्रा ५ महिने १५ दिवस अटकेपासून कसा काय वाचला?


या पूर्वीही राम कदम यांनी राज कुंद्रावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले होते. राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप केला होता.

हेही वाचा – भाजपा नेते राम कदम यांचे राज कुंद्रावर गंभीर आरोप, म्हणाले…

ते म्हणाले होते, राज कुंद्राने या गेमच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव व फोटोंचा वापर केला होता. राज कुंद्राने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून फसवणूक केली. शिल्पा शेट्टीच्या गुणांचा आम्ही सन्मान करतो, मात्र या गेमच्या प्रचारासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा देखील वापर केला गेला. राज कुंद्राची विआन इंडस्ट्री नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये ते संचालक आहेत. विआन कंपनीचा GOD (Game of Dots) नावचा एक खेळ आहे. हा एक लीगल ऑनलाइन गेम असल्याचं सांगितलं गेलं आहे. विआन कंपनीच्या लेटरहेडवर शिल्पा शेट्टीच्या फोटोचा प्रमोशनसाठी वापर केला जात होता. असं सांगितलं गेलं आहे की हा खेळ सरकारमान्य आहे. या खेळात बक्षीसाची रक्कम दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. देशभरातील लोकांना लुटलं गेलं आहे. २५०० ते ३००० कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केला आहे.