Raj Thackeray on Alliance with Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही बाजूच्या काही नेतेमंडळींनी केलेल्या तशा प्रकारच्या विधानांमुळे या चर्चेत आणखीनच भर पडली. त्याचवेळी राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्यासंदर्भात जाहीर केलेल्या त्रिभाषा सूत्रालाही मोठा विरोध होऊ लागला. त्याविरोधात येत्या ५ जुलैला राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती लवकरच प्रत्यक्षात होईल असे तर्क सुरू झाले आहेत. यासंदर्भात सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये खुद्द राज ठाकरेंनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

नेमकं घडलं काय?

येत्या ५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मराठीजनांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. यात उद्धव ठाकरेंची शिवसेनाही सहभागी होणार हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन्ही ठाकरेंना अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र बघण्याचा योग येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी त्रिभाषा सूत्र लागू करणारा अध्यादेशच रद्द केल्यामुळे ५ जुलैचा मोर्चाही रद्द करावा लागला. मात्र, त्याऐवजी विजयी मेळावा मात्र केला जाणार आहे.

दरम्यान, त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गट व मनसे या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व नेतेमंडळी एकत्र दिसल्यामुळे यातूनच राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या आगामी युतीची सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी हिंदी सक्तीच्या या सर्वपक्षीय भूमिकेला पक्षीय लेबल लावण्यास नकार दिला. तसेच, चर्चेत असलेल्या युतीसंदर्भातही सूचक भाष्य केलं.

उद्धव ठाकरेंशी युती कधी होणार?

“मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका, विजयी मेळाव्यालाही पक्षीय लेबल लावू नका. युत्या-आघाड्या या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण मराठी भाषा संपली तर परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच गेली, तर या युत्या-आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार निवडणुकांच्या वेळी करता येईल. आत्ता त्या गोष्टीचा विचार करता येणार नाही. आत्ता हिंदीसंदर्भातील या सगळ्या गोष्टींकडे एक संकट म्हणूनच पाहायला हवं. त्याला राजकीय लेबलं लावू नयेत”, असं म्हणत राज ठाकरेंनी इतक्यात युतीबाबतचा कोणताही निर्णय जाहीर होण्याच्या शक्यतेवर पडदा टाकला.

“अजित पवारांनीही हिंदी सक्तीला विरोध केला आहे”

हिंदी सक्तीला विरोध करण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनीही विरोध केल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. “राज्य सरकारमधल्या अनेक मंत्री-आमदारांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. अजित पवारांनीही विरोध केला आहे”, असं ते म्हणाले. तसेच, या मुद्द्यावर राज्य सरकारने कुणीचीही समिती नेमली, तरी आमची भूमिका कायम राहणार असल्याचंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. मग कुणाचीही समिती अभ्यास करू देत. महाराष्ट्रात मराठी माणसांनी या गोष्टीला जसा विरोध केला आहे, त्याची जाणीव जाधवांना असावी. महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबलेले आहेत. उगाच भाषेवर विषय आणू नका. आमदारांनीही आता या विषयावर अधिवेशनात चर्चा करून वेळ वाया घालवू नये, महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करावी. जीआर रद्द झाला आहे. आता इतर विषयांवर बोलावं. शिक्षणात अनेक त्रुटी आहेत. शाळा नाहीयेत. शिक्षकांना पगार नाहीयेत. अशा इतर अनेक विषयांना हात घालावा”, असं आवाहन राज ठाकरेंनी सर्वपक्षीय आमदारांना केलं आहे.