Raj Thackeray-Sanjay Raut was Going to start Newspaper : शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सर्वांना माहिती आहेत. संजय राऊत ठाकरे गटात तर राज ठाकरेंचा वेगळा पक्ष असला तरी या दोघांची मैत्री अजूनही तितकीच घट्ट असल्याचं हे नेते सांगतात. हे दोन्ही नेते तरुणपणात शिवसेनेसाठी एकत्र काम करत होते. त्याच काळात या दोघांनी एक वेगळं वृत्तपत्र सुरू करण्याची योजना बनवली होती. शिवसेनेचं ‘सामना’ हे वृत्तपत्र, ‘मार्मिक’ हे मासिक असतानाही त्या काळात या दोन नेत्यांनी स्वतःचं वेगळं वृत्तपत्र सुरू करण्याची योजना का आखली होती याचा मजेशीर किस्सा संजय राऊत यांनी सांगितला आहे. मित्रम्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

संजय राऊत म्हणाले, “माझ्या कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी फार पूर्वीपासून जवळचे संबंध राहिले आहेत. मुळात माझ्या पत्रकारितेची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच झाली. ते स्वतः मला ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये संपादकीय विभागातील नोकरीसाठी घेऊन गेले होते. तसेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे माझे जवळचे मित्र आहेत. आमचं मित्रत्त्वाचं नातं आहे. एक वेळ अशी आली होती की मी व राज ठाकरे एक वृत्तपत्र काढणार होतो. आमचं तसं ठरलं होतं. त्या काळात आम्ही एकत्र असल्यामुळे अशा योजना आखायचो. तेव्हा मी लोकप्रभेत अंडरवर्ल्डच्या कथा लिहायचो, त्या पत्रकारितेमुळे मला एक ग्लॅमर लाभलं होतं. लोकांनाही अंडरवर्ल्डच्या गोष्टी आवडायच्या. आमचं मासिक (लोकप्रभा) सकाळी स्टॉलवर आल्यानंतर १५ मिनिटात त्याचे सगळे अंक संपायचे. कारण त्यामध्ये माझ्या अंडरवर्ल्डच्या कथा असायच्या. लोकांनाही त्या कथा वाचायला आवडायच्या.”

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “लोकप्रभात मी अंडरवर्ल्डवर जी मुख्य स्टोरी लिहायचो तिची जाहिरात ‘लोकसत्ते’च्या पहिल्या पानावर छापली जायची. हे सगळं पत्रकारांना मिळणारं ग्लॅमर मी अनुभवलं आहे. लोकांना अंडरवर्ल्डबद्दल प्रचंड उत्सुकता होती. तरुण अंडरवर्ल्डच्या गोष्टी वाचायचे, थरथरायचे. अंडरवर्ल्डमध्ये रोज काही ना काहीतरी घडत असायचं. खून, अपहरण, धाडी असं सगळं चालायचं. तेव्हा वृत्तपत्रांमध्ये याच्या खूप लहान बातम्या असायच्या. मात्र मासिकांमध्ये त्याच बातम्या सविस्तर लिहिल्या जायच्या. ते थरारक, रोमांचक प्रसंग वाचायला लोकांना आवडायचे. एकदा न्यायालयात गोळ्या घालून हत्या झाल्याचं प्रकरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. याच कथा मी आमच्या मासिकात लिहायचो.”

‘त्या’ वृत्तपत्राचं पुढे काय झालं?

दरम्यान, संजय राऊत यांना विचारण्यात आलं की राज ठाकरे यांच्याबरोबर तुम्ही जे वृत्तपत्र सुरू करणार होता. त्याचं काय झालं? त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलं होतं की आपण एक वृत्तपत्र काढूया. कारण आम्हाला असं वाटायचं की बाजारात जी वृत्तपत्रे उपलब्ध आहेत, त्यामध्ये नव्या वृत्तपत्रासाठी संधी आहे. बाजारात एक पोकळी आहे जी आम्ही भरून काढू शकतो, आमचं वृत्तपत्र ती पोकळी भरून काढू शकतं.” संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले, “आम्ही त्यावेळी विचारवंत होतो… त्यामुळे आमच्या मनात असे विचार यायचे.”

राऊत म्हणाले, “राज ठाकरे तेव्हा ‘लोकसत्ते’त व्यंगचित्र काढायचे. व्यंगचित्रांच्या निमित्ताने ते आमचे संपादक माधव गडकरी यांना येऊन भेटायचे. राज ठाकरे हे खरंच खूप छान व्यंगचित्र काढायचे. तितकेच ते रुबाबदारही होते. आम्ही तेव्हा भेटायचो, बोलायचो, त्याच काळात आमच्या मनात विचार आला की आपण एक वृत्तपत्र काढूया. तेव्हा टीव्ही, वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमांचं एवढं मोठं जाळं नव्हतं. त्यामुळे आम्हाला वाटायचं की आम्हाला व आमच्या वृत्तपत्राला संधी आहे.”

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : “माझा करेक्ट कार्यक्रम फक्त…”, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर

वृत्तपत्राचं नाव काय ठरवलेलं?

खासदार म्हणाले, “आमच्या दोघांचा विचार सुरू असतानाच त्यात उद्धव ठाकरे यांची एंट्री झाली. ते म्हणाले, आपण ‘सामना’च (शिवसेनेचं मुखपत्र) चांगल्या प्रकारे चालवला पाहिजे. मात्र राज ठाकरे यांच्या डोक्यात होतं की आपण ‘मराठा’ या वृत्तपत्राचं पुनर्जीवन करावं. ‘मराठा’सारखं वृत्तपत्र काढू, असं राज यांच्या मनात होतं. आम्ही दोघेही त्याबाबतीत गंभीर होतो. त्यानंतर आम्हाला वाटलं ‘सामना’ हेसुद्धा ‘मराठा’चंच दुसरं रुप आहे.”