Raj Thackeray Shivsena UBT and Maratha Protest : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. ते आज सायंकाळी बीडमध्ये दाखल झाले. दरम्यान, मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी थांबले होते. तत्पूर्वी मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली. या जमावातील काही लोक ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत होते. त्यामुळे हे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते असावेत, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे, मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू शकतात.

दरम्यान, राज ठाकरे यांचे स्वागत ज्या ठिकाणी केलं जाणार होतं त्या ठिकाणी जमावाने सुपाऱ्या फेकल्या, ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशा घोषणा देखील दिल्या. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केलं.

राज ठाकरे कोणाची सुपारी घेऊन आलेत? उबाठा गटाचा प्रश्न

दरम्यान, राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले शिवसेनेच्या ठाकरे गटातील काही कार्यकर्ते, बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर एबीपी माझाशी बोलत असताना म्हणाले, राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा दिला (भाजपाला) होता. आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आले आहेत? हे विचारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.

हे ही वाचा >> लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर खासदार नारायण राणेंचे फोटो न छापल्याने भाजपा – शिवसेनेत पुन्हा वाद

मराठा आंदोलक राज ठाकरेंचा विरोध का करतायत?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समुदाय त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करू लागला आहे. दोन समाज संघर्ष करत असताना राज्य सरकारने यावर भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मराठा, ओबीसींसह सर्वच समाज राज ठाकरेंवर संतापले आहेत. “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. आपल्याला केवळ पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं.

हे ही वाचा >> Manoj Jarange : “शेवटच्या उपोषणामुळे खूप हाल झाले, पायऱ्याही चढता येत नाहीत”, मनोज जरांगेंनी दिली प्रकृतीची माहिती, म्हणाले, “सकाळीच सलाईन लावून…”

धाराशिवमध्येही मराठा कार्यकर्त्यांचा विरोध

राज ठाकरे यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरातून निषेध केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी राज ठाकरे धाराशिव येथे मुक्कामासाठी आले असता, त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा तरूण जोरदार घोषणाबाजी करीत हॉटेलमध्ये घुसल्याचं पाहायला मिळालं. त्यापाठोपाठ आज बीडमध्येही राज ठाकरे यांना मराठा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.