Raj Thackeray Post : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची धुरा कोणाच्या हातात जाणार? राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोण भूषवणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठीच असावा अशी भूमिका घेतली आहे. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणावर देखील भाष्य केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत की, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल.”
पुढे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सुरू असलेल्या घडामोडींवर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषा हे मुद्द्यांसाठी कायम लढा देणाऱ्या राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा असे म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही!”

