Raj Thackeray birthday tree plantation drive: ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. पण, वाढदिवशी राज ठाकरे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मुंबईत हजर नसतील, या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंनी त्यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शहरांमध्ये शुभेच्छांची होर्डिंग्स न लावता राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबतची सविस्तर पोस्ट राज यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे.

वाढदिवशी होर्डिंग्स न लावण्याचे आवाहन

वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शुभचिंतकांची भेट होऊ शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. पण, “यावेळी शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा”, असे आवाहन राज यांनी केले आहे. “वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा”, अशी विनंती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

राज्यभर फुलांची, फळांची झाडं लावण्याचे आवाहन

“यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा. फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात. बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या. झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील, बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत. अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील”, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा

“यावर्षी पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या”, असेही राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

उपक्रमाचा उद्देशही केला स्पष्ट

राज ठाकरेंनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना, “यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे. म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत,” असे सांगितले.

स्थानिकांना विश्वासात घेण्याचे आवाहन

“झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा”, असे बजावून सांगताना त्यांनी, “तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका”, असेही स्पष्ट केले. “आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत”, अशी भावनिक सादही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना घातली.